महाराष्ट्राची सूत्रे आता संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मश्गुल आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रेलखातून करण्यात आली आहे.
राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधा-यांची धारणा आहे. मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मिताही गटांगळ्या खाताना दिसत आहे. हे गंभीर आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच. पण सुलतानी संकटाचे राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते. आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत. नाथांनी या संकटात “बये दार उघड” अशी आरोळी ठोकून महाराष्ट्राचे मन जागे केले होते. आजचा महाराष्ट्र तसा जागाच आहे. तो पेटून उठेल, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
राजकीय घडामोडींचा फैसला न्यायालयात
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीभेटीत त्यांनी मोदी- शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त केले. स्वत:ला शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे, असे म्हणत सामना अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे.
( हेही वाचा ‘संजय राऊत, तुम्ही नगरसेवक म्हणून तरी निवडून दाखवावं’, शिंदे गटातील खासदाराचे आव्हान )
मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर टीकास्त्र
याआधी महाराष्ट्रात शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत होते, पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गाटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमान मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला.
Join Our WhatsApp Community