राज्यातील नव्या सरकारमध्ये मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, एका राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे.
3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न
राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदार नंदनवन आणि सागर या ठिकाणी फे-या मारताना दिसत आहेत. याचा फायदा घेत या चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
या आरोपींनी आधी आमदारांना फोन करुन आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. तसेच, मोठ्या मंत्र्यांनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमडळात मंत्रिपद हवे असेल, तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील. फोनवरील संभाषणानंतर 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेराॅय हाॅटेलमध्ये भेट घेतली.
उर्वरित रक्कम मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्या…
मंत्रिमंडळात स्थान हवे असेल, तर 100 कोटी द्यावे लागतील, त्यापैकी 20 टक्के रक्कम आता द्यावी लागेल आणि उर्वरित मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्यावी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले. आरोपींनी सोमवारी आमदारांना नरिमन पाॅइंटवर भेटण्यासाठी बोलावले, त्यानंतर आमदारांनी त्यांना पैसे घेण्यासाठी ओबेराॅय हाॅटेलमध्ये नेले.
( हेही वाचा: शिवसेना फोडणे आणि फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे, यातच मुख्यमंत्री मश्गुल; सामना अग्रलेखातून टीका )
मुंबई गुन्हे शाखेची कारवाई, आणखी 3 आरोपींची नावे समोर
मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर गुन्हे शाखेच्या अॅंटी एक्स्टाॅर्शन सेलने सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी 3 आरोपींची नावे समोर आली, ज्यांना नंतर अटक करण्यात आली.