शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता मिळणार का या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करत युतीबाबत उद्धव ठाकरे आग्रही असल्याचे सांगितले. त्यामुळे 2019 मध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
या चर्चेत ठरल्याप्रमाणे भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप स्वतः उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी केला. पण याचबाबत आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठा खुलासा केला आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेत काय चर्चा झाली हे आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेव्हाच सांगितले होते, असे म्हणत त्यांनी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीचा पूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
(हेही वाचाः राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार)
मातोश्रीवर भेट
2019 माझ्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद होते. तेव्हा पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मला फोन करुन शिवसेनेसोबत युतीची चर्चा करण्याबाबत सांगितले. त्यानंतर या चर्चेसाठी तयार करण्यात आलेल्या टीममध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांसारख्या नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ठरल्याप्रमाणे शहा-ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली.
उद्धव ठाकरेंनी विषय टाळला
या भेटीवेळी आपण दोघांनी चर्चा करुया असे सांगत उद्धव ठाकरेंनी अमित शहांसोबत बंद दाराआड चर्चा केली. त्यावेळी आम्ही सर्वजण बाहेर थांबलो होतो. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत या चर्चेत काय झाले हे सांगितले नाही व मुख्यमंत्रीपदाचा विषयही काढला नाही. पण अमित शहा यांनी मात्र चर्चेत काय झाले ते आम्हाला सह्याद्री अतिथी गृहात सांगितले.
(हेही वाचाः ‘संजय राऊत, तुम्ही नगरसेवक म्हणून तरी निवडून दाखवावं’, शिंदे गटातील खासदाराचे आव्हान)
युतीच्या फॉर्म्युल्याची आठवण
उद्धव ठाकरेंनी आपल्याशी चर्चा करताना निवडणुकांमधील जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा विषय काढला. पण मी त्यांना युतीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली. शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकत्र आले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ही युती घडवून आणली. ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री होईल, हा फॉर्म्युला तेव्हाच ठरला होता. त्यामुळे या फॉर्म्युल्यात कोणताही बदल होणार नसल्याचे आपण उद्धव ठाकरेंना सांगितले असल्याचे अमित शहा म्हणाले होते, असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
असंतोषाचा उद्रेक
मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर युतीला जनमताचा कौल मिळून सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी शिवसेनेने दगाफटका केला. ही गोष्ट शिवसेना आमदार-खासदारांनाही रुचली नव्हती. त्यामुळेच या असंतोषाचा उद्रेक होऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी हा उठाव केल्याचेही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community