शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदेंनी बंड करून राज्यात भाजपसह सत्ता स्थापन केली. एकीकडे राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा मिळत असल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. कित्येक आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात सहभागी होण्याच्या दिशेने आहेत. अनेक नगरसेवक, पदाधिकारी आता शिंदे गटात सामील होताना दिसताय. अशातच आता औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये शिवसेनेचे ४ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.
(हेही वाचा – राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार)
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे ४ नगरसेवर नुकतेच शिंदे गटात दाखल झाले आहेत तर आणखी १० ते १२ नगरसेवक शिंदे गटात सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाठ, वर्षाराणी वाडकर आणि विकास जैन आदी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. २९ पैकी ४ नगरसेवक उघडपणे शिंदे गटात दाखल असून येत्या काळात आणखी १० ते १२ नगरसेवक फुटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा झटकाच असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसात राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूंकप झाला. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात नवं शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिवसेनेला एका मागोमाग एक असे मोठे धक्के मिळत आहे.
Join Our WhatsApp Community