राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु असताना एकमेव सोलापूर जिल्ह्यात पावसाने फारशी कृपादृष्टी दाखवलेली नाही. यंदाच्या आठवड्यात पावसाने काही ठिकाणी गैरहजेरी लावल्याने सोलापुरात तापमान वाढत आहे. बुधवारी सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वात जास्त तापमान नोंदवले गेले.
सोलापुरात काही दिवसांपासून पावसाने फिरवलेली पाठ
सोलापुरात ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सोलापुरातील कमाल तापमान १.५ अंशाने जास्त नोंदवले गेले. सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. यंदाच्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने ब-यापैकी ब्रेक घेतला आहे. सध्या महाबळेश्वर येथे पावसाचा सातत्याने मारा सुरु आहे. बुधवारीही महाबळेश्वरला ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ही नोंद राज्यभरात सर्वात जास्त होती. किमान तापमानही महाबळेश्वरमध्ये खाली उतरले होते. महाबळेश्वरमध्ये १७.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमधील बुधवारचे राज्यातील किमान तापमान सर्वात कमी होते. विदर्भातही धुमाकूळ घालणा-या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दडी मारली आहे. केवळ चंद्रपुरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 05 मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी पावसाचे शिडकावेच होते. मराठवाड्यात औरंगाबाद वगळता पावसाचा कुठेही जोर नाही. औरंगाबादमध्ये सायंकाळी साडे पाच वाजता केवळ ८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर नाशकात १३ मिमी आणि कोकणात डहाणू आणि सांताक्रूझ येथे केवळ ७ मिमी पावसाची नोंद झाली.
(हेही वाचा OBC RESERVATION : ‘या’ जिल्ह्यांना मिळणार नाही आरक्षण!)
तापमानावर परिणाम
गेल्या आठवड्यात विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपले. त्याच्या प्रभावाने अद्यापही विदर्भातील कमाल आणि किमान तापमान गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत कमीच नोंदवले गेले. राज्यात उर्वरित ठिकाणीही अद्याप तापमान वाढ झालेले नाही. परभणी आणि डहाणू येथे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत एका अंशाने जास्त असून दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे ३२.७ तर ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले आहे.
Join Our WhatsApp Community