ई-सिगारेटच्या धुरात हरवली तरुणाई

201
‘इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम’ अर्थात ई-सिगारेट हे उपकरण तंबाखू विरहित असले तरी शरीराला हानीकारक आहे. देशातील तरुणाई या इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या धुरात हरवत चालली आहे. १२ वर्षांपासूनची अल्पवयीन मुले ते अगदी वयोवृद्ध महिला पुरुष ई- सिगारेटकडे आकर्षित होत आहेत. भारतात या ई -सिगारेटवर बंदी असली तरी या ई- सिगारेटची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सर्रासपणे त्याची विक्री करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण शाखेने (सीबी कंट्रोल) दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील काही ठिकाणी गेल्या आठवड्यात कारवाई केली. या कारवाईतून पोलिसांनी ई-सिगारेट तसेच या सिगारेटसाठी लागणा-या द्रव्याच्या बॉटल असा एकूण जवळपास १६ लाख रुपये किंमतीचे सिगारेट आणि त्यातील द्रव्य  जप्त करण्यात आले आहे. परंतु या छोट्या मोठ्या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या ई-सिगारेट आणि त्याचे द्रव्य विकणारे तसेच त्याची आयात करणाऱ्यांवर कुठलाही फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे, देशभरात या ई- सिगारेटची आयात मोठ्या प्रमाणात होत आहे.

कुठे मिळते ई -सिगारेट?

देशभरात ई -सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, तरुणांमध्ये हे व्यसन अधिक प्रमाणात आहे. शाळकरी मुले, कॉलेज तरुण-तरुणींना ई- सिगारेटचे मोठे आकर्षण आहे.  ई- सिगारेट आणि त्यातील द्रव्य हे ऑनलाइन मार्केटिंग करणाऱ्या प्रत्येक कंपन्यांकडे उपलब्ध आहे. तसेच पानटपऱ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारे दुकानदारही याची विक्री करतात. मुंबईतील हिरापन्ना मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, नागपाडा तसेच पश्चिम उपनगरातील अनेक शॉपमध्ये ई- सिगारेट सर्रासपणे विकले जात आहेत.

ई- सिगारेटचा वापर कसा केला जातो?

सामान्य सिगारेट आणि ई-सिगारेटमधील सर्वात मोठा फरक म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेटमध्ये तंबाखू नसतो. ई-सिगारेट अगदी सिगारेटप्रमाणेच बनवल्या जातात. त्याच्या शेवटी एलईडी बल्ब बसवलेला आहे. ई-सिगारेट अनेक फ्लेवर्समध्ये येते आणि ती सिगारेटपेक्षा स्वस्त आहे. ई-सिगारेटमध्ये लिक्विड निकोटीनचे कार्टेज असते. कार्टेज संपल्यानंतर बदलले जाऊ शकते. ई-सिगारेटमध्ये असलेले द्रव निकोटीन जळत नाही. त्यामुळे त्यातून धूर निघत नाही आणि सिगारेटसारखा वास येत नाही. द्रव निकोटीन वाष्पीकरण करण्यासाठी गरम केले जाते.

दुष्परिणाम काय आहेत ?

एका अहवालातून ई- सिगारेट आणि त्यात वापरण्यात येणा-या द्रव्याचा आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे समोर आले आहे. या अहवालात ई-सिगारेटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे, एका संशोधनात असे दिसून आले आहे की ई-सिगारेटमध्ये वापरण्यात येणारे फ्लेवरिंग लिक्विड हृदयाला हानी पोहोचवू शकते. ई-सिगारेटमुळे कर्करोगाचा धोका तर वाढतोच पण हृदयविकाराचा झटकाही वाढतो. त्याचवेळी, ई-सिगारटेमुळे नैराश्याचा धोका वाढतो.  ई-सिगारेटमधील दालचिनी आणि मेन्थॉल फ्लेवर्स हे सर्वात धोकादायक मानले जात होते. संशोधनात असे आढळून आले की, ई-सिगारेट ओढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ५६  टक्क्यांनी वाढतो.
भारतात ई-सिगारेटवर आहे बंदी….
भारतात ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी आहे. सरकारने त्याचे उत्पादन, वितरण, विक्री यावर बंदी घातली आहे. तरुणांमध्ये  ई-सिगारेटचा कल सर्वाधिक होता. अगदी शाळकरी मुलेही या सिगारेटचा जास्त वापर करत असल्याने, सरकारने त्यावर बंदी घातली होती. आरोग्य मंत्रालयाने अध्यादेशात प्रथमच नियम मोडल्यास १ वर्षाचा तुरुंगवास आणि १ लाख रुपये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव दिला आहे.  याशिवाय नियमांचे एकापेक्षा जास्त वेळा उल्लंघन केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.