मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या ६ महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२२ ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील ७४५ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ४९० मुले आणि २५५ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. म्हणजे महिन्याला १२४ मुलांची आणि दिवसाला सरासरी चार मुलांची सुटका आरपीएफच्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक ३८१ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात २७० मुले आणि १११ मुलींचा समावेश आहे.
(हेही वाचा – तो डोंगर, ती झाडी, तेच आरे… मेट्रो कारशेड Ok होणार हाय!)
रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत असते. भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.
गेल्या वर्षी म्हणजे २०२१ च्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफ ने शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६०३ मुले आणि ३६८ मुलींसह ९७१ मुलांची सुटका केली आहे.गेल्या ६ महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२२ ते जून २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील ७४५ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ४९० मुले आणि २५५ मुलींचा समावेश आहे.
मध्य रेल्वेवर जानेवारी ते जून २०२२ पर्यंत सुटका केलेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे आहे:
- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक ३८१ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात २७० मुले आणि १११ मुलींचा समावेश आहे.
- भुसावळ विभागात १३८ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात ७२ मुले व ६६ मुलींचा समावेश आहे.
- पुणे विभागात १३६ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून यामध्ये ९८ मुले आणि ३८ मुलींचा समावेश आहे.
- नागपूर विभागात सुटका केलेल्या ५६ मुलांमध्ये ३० मुले आणि २६ मुलींचा समावेश आहे.
- सोलापूर विभागात सुटका केलेल्या ३४ मुलांची नोंद झाली असून त्यात २० मुले व १४ मुलींचा समावेश आहे.