आदित्य ठाकरेंबद्दल आदर आहे. ते बाळासाहेबांचे वंशज आहेत. ठाकरे घराण्याबद्दलही आदर आहे. मी आज आदित्य ठाकरेंना थेट आव्हान देतो की, त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मी लगेच राजीनामा देतो. मी परत निवडणूक लढवतो. परत बाळासाहेबांचा सैनिक म्हणून निवडणूक लढून विधानसभेत पोहोचेल, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्याचा निधी का दिला नाही, पर्यटन खात्यातील एक प्रकल्प नांदगावमध्ये दाखवा मी लगेच राजीनामा देतो, असे म्हणत शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिले आहे.
सुहास कांदेंचे आदित्या ठाकरेंना सवाल
- ज्यांनी आनंद दिघेंच्या माध्यमातून वयाच्या 16 व्या वर्षापासून राजकारण सुरु केले. त्या एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना सुरक्षा दिली नाही. त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यायला हवी होती. हिंदुत्वाच्या विरोधकांना सुरक्षा दिली, पण शिंदेंना दिली नाही. का दिली नाही?
- ज्या याकूब मेमनने हिंदू मारले. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. त्याला न्यायालयाने फाशी दिली. त्याला फाशी देऊ नये म्हणून एक पत्रक काढण्यात आले. त्यावर अस्लम शेख आणि नवाब मलिकांची सही होती. त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसायचे का?
- दाऊदने रेल्वेत बाॅम्बस्फोट घडवले. त्याच्यासोबत नवाब मलिकांचे कनेक्शन निघाले. त्या मलिकांचा तुरुंगात असतानाही राजीनामा घेतला नाही. त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसायचे का?
- पालघरमध्ये साधूंची हत्या झाली. दोन दिवसात आरोपींना जामीन झाला. तरीही आम्ही गप्प बसायचे?
- सावरकरांना माफीवरी म्हणून हिणवलं. आमची घुसमट झाली. तोंड दाबून बुक्यांचा मार झाला. तरीही आम्ही काॅंग्रेससोबत सत्तेत राहायचे का?
- आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्यातून नांदगावमध्ये छत्रपती महाराजांचा अश्वारुढ पुतळा का दिला नाही? 50 पत्रं दिले, पण त्यावर उत्तर नाही. आंबेडकर स्मारकासाठी अनेकदा पत्र दिले. का नाही स्मारक उभारु दिले? राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारायचे होते. मी अनेकदा पत्रं दिले. त्यावरही निर्णय घेतला नाही. आदित्य ठाकरेंना दिलेल्या साडेसातशे पत्रांच्या झेराॅक्स माझ्याकडे आहेत.