महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमक्या येत होत्या. त्यामुळे त्यांना विशेष सुरक्षा कवच देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. मात्र, एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, असा फोन खुद्द मातोश्रीवरून आल्याचा आरोप शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
(हेही वाचा – आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणाले “….दरवाजे उघडेच आहेत”)
काय केला आरोप
नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी गृह विभागाने त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण, तत्कालीन गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांना मातोश्रीवरून सकाळी ८.३० वाजता फोन आला आणि एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा सूचना करण्यात आल्याचे कांदे यांनी म्हटले आहे. एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना, त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा का पुरवण्यात आली नाही, असा सवाल कांदे यांनी केला. याउलट, जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झे़ड प्लस सुरक्षा देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
शंभूराज देसाईंकडूनही दुजोरा
दरम्यान, तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही यास दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, त्यावेळी शिंदेंना विशेष सुरक्षा देण्याची गरज नसल्याचा निरोप वर्षावरून आल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.