ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही तसे गांधी म्हणजे भारत नाही

197

महाराष्ट्रात एक गंमत नेहमीच सुरु असते. ठाकरेंच्या शिवसेना पक्षावर किंवा ठाकरेंवर टीका केली की ती महाराष्ट्रावर केलेली टीका असते. हे नॅरेटिव्ह गेली ३० वर्षे सेट केलं होतं. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, लोकांची विचार करण्याची कक्षा उंचावली नव्हती, त्यामुळे लोकांवर एखादी गोष्ट थोपवणे सोपं होतं. त्याचबरोबर गांधी म्हणजे देश असाही एक गोड गैरसमज होता.

( हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना कॉल; इगो संपल्यामुळे की इगो वाढल्यामुळे?)

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगना राणावतने ठाकरे सरकारवर टीका केली तेव्हा सरकारच्या समर्थकांनी तिने महाराष्ट्राची बदनामी केली असा कांगावा केला. आता सोनिया गांधी यांना ईडीने नोटिस पाठवल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधींना नोटिस बजावल्यावर देखील त्यांनी अशीच निदर्शने केली होती.

महाराष्ट्रात शिवसेना परिवारवादातून बाहेर पडत आहे. पण कॉंग्रेसला अजूनही गांधी घराण्याची साथ सोडाविशी वाटत नाही. राहुल गांधी आणि प्रियांका वडेरा हे अनेकदा नापास झालेत. त्यांचा अन्नू गोगट्या झालेला आहे. बरं तो अन्नू गोगट्या तरी कॉंग्रेसला सावरु शकेल पण हे भाऊ-बहिणीची ही जोडी कॉंग्रेसला आणखी मातीत गाडत चाललेली आहे. हे कुटुंब म्हणजे कॉंग्रेसला लागलेलं ग्रहण आहे. कॉंग्रेसजनांना मात्र या कुटुंबावर नितांत प्रेम आहे. हेच आपले खरे मालक असं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं आहे. नव्हे नव्हे मनावर कोरून ठेवलं आहे.

गांधी म्हणजे देश नाही आणि गांधी म्हणजे कॉंग्रेस देखील नाही

त्यातूनच भ्रष्टाचार केल्यावर जणू क्रांतिकार्यात सहभागी झाल्याचा आव आणत ही आंदोलने सुरु झालेली आहेत. याच कुटुंबाने मोदी-शहा या जोडीला प्रचंड त्रास दिला. तरी त्यांनी संविधान धोक्यात, लोकशाही वाचवा असली भंपक विधाने केली नाहीत. ते कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेले आणि त्यांची निर्दोश सुटका झाली. जर या कुटुंबाने काही गुन्हा केला नसेल तर त्यांना घाबरण्याची काय गरज? आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत असेल तर यात संविधानाला धोका निर्माण होत नसू संविधान अधिक मजबूत होत आहे. कारण भ्रष्टाचारावर आळा बसवणं म्हणजे संविधानाचं रक्षण करणं होय.

आता गांधी परिवाराने गांधी म्हणजे देश या बालीश कल्पनेतून बाहेर पडून सत्य स्वीकारायला पाहिजे की बहुसंख्य जनतेने देशात आणि अनेक राज्यात तुम्हाला नाकारलेलं आहे. गांधी म्हणजे देश नाही आणि गांधी म्हणजे कॉंग्रेस देखील नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.