महानगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक गिरवणार नेतृत्व कौशल्याचे धडे

148
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापकांना जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्याद्वारे नेतृत्व विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्यावतीने सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वतीने संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.  महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रा. कविता लघाटे, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे सुमारे १२० मुख्याध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.

( हेही वाचा: दादर ते अंबरनाथ अमित ठाकरेंनी केला लोकलने प्रवास; पाहा व्हिडीओ )

पालिकेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न
मुख्याध्यापक नेतृत्व कौशल्य प्रशिक्षणाविषयी मुख्याध्यापकांसाठीचे नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण ३ महिन्यांत ४० सत्रे व ६० तासांत पूर्ण करण्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्यवस्थापन कौशल्ये व आर्थिक बाबी हाताळणे, विद्यार्थी-पालक-समाज-लोकप्रतिनिधी यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन करणे, संघभावनेतून कामकाज करण्याचे कौशल्य विकसित करणे, स्व-विकास करणे, शिक्षकांना प्रेरणा देणे, शालेय विकासाचा दूरगामी आराखडा तयार करणे, निर्णयक्षमता वाढवणे, प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अशा शालेय विकासासाठी आवश्यक विविध बाबींचा समावेश असणार आहे. या प्रशिक्षणातून मुख्याध्यापकांना एकप्रकारे  शाळेचा मुख्य कार्य अधिकारी (सीईओ-CEO) बनवण्याचा व त्या रुपाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा देशामध्ये आणखी गौरव वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.