श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी ज्येष्ठ राजकीय नेते दिनेश गुणवर्धने यांची निवड करण्यात आली असून त्यांनी आज, शुक्रवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गुणवर्धने हे ज्येष्ठ राजकारणी, संसद सदस्य, माजी कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच ते विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचे वर्ग मित्र असल्याचे सांगितले जाते.
राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघेंकडून पंतप्रधानपदी गुणवर्धनेंची नियुक्ती
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदी गुणवर्धने यांची नियुक्ती केली आहे. गुणवर्धने यांनी आधीच्या गोटाबाया-महिंदा सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण मंत्री पद भूषवले आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी एप्रिलमध्ये त्यांना गृहमंत्री केले होते. गेल्या काही महिन्यांपासून देशातील नागरिकांना अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात देशात प्रचंड गदारोळ आणि विरोध झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांनी कुटुंबासह देश सोडून पलायन केले होते. त्यानंतर, संसदेने गोटाबाया यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी रानिल विक्रमसिंघे यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
गुणवर्धने कुटुंबाचे भारताशी चांगले संबंध
गुणवर्धने यांच्या कुटुंबाचे भारताशी चांगले संबंध आहेत. गुणवर्धने यांचे वडील फिलिप गुणवर्धने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. युनायटेड स्टेट्स आणि नेदरलँड्समध्ये शिक्षण घेतलेले दिनेश गुणवर्धने हे त्यांचे वडिलांप्रमाणेच ट्रेड युनियनचे नेते आणि एक प्रखर सेनानी आहेत. फिलिप गुणवर्धने यांना श्रीलंकेतील समाजवादाचे जनक म्हणून ओळखले जाते. फिलिप गुणवर्धने यांचे भारतावरील प्रेम आणि साम्राज्यवादी कब्जाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी प्रयत्नांची सुरुवात १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला युनायटेड स्टेट्समध्ये झाली. या कामात त्यांच्या पत्नीनेही त्यांना चांगली साथ दिली.
(हेही वाचा – रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती)
फिलिप गुणवर्धने हे विस्कॉन्सिन विद्यापीठात जयप्रकाश नारायण आणि व्ही.के. कृष्ण मेनन यांचे वर्ग मित्र होते. त्यांनी अमेरिकन राजकीय वर्तुळात साम्राज्यवादापासून स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. नंतर त्यांनी लंडनमध्ये अँटी इम्पेरिअलिस्ट लीग ऑफ इंडियाचे नेतृत्वही केले. त्यांच्या कुटुंबाचे भारताशी जवळचे नाते आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. संपूर्ण गुणवर्धने कुटुंबाचा भारताभिमान आहे.
Join Our WhatsApp Community