मुख्याध्यापकांनी मुख्याधिकारी म्हणून भूमिका निभवावी! अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे उद्गार

133
मुख्याध्यापक हा शाळा आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो. ‘जसा मुख्याध्यापक, तशी शाळा’ हे वास्तव असते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, एकप्रकारे शाळांचा मुख्याधिकारी म्हणूनच त्यांनी सर्वतोपरी भूमिका बजावावी, यासाठी नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, असे उद्गार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे यांनी काढले.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापकांना जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्याद्वारे नेतृत्व विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी  भिडे या बोलत होत्या. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटनदेखील करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्यावतीने सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्च्या वतीने संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रा. कविता लघाटे, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे सुमारे १२० मुख्याध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.

…म्हणून हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरेल

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त  आयुक्त  आश्विनी भिडे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सर्वच घटकांमधील विद्यार्थी शिकतात. त्यातही बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. अशा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून महानगरपालिका वैविध्यपूर्ण उपक्रम राबवते. विद्यार्थ्यांचे वैविध्य, शिक्षण विभागातर्फे राबवले जाणारे उपक्रम, प्रशासकीय कामे अशा सर्व बाबी लक्षात घेतल्या तर मुख्याध्यापकांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपते. अशा स्थितीत त्यांना नेतृत्व कौशल्याचे धडे देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापकांना नानाविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरेल. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या व्यक्तिगत विकासासाठी व एकूणच शाळांच्यादृष्टीने देखील ही कार्यशाळा व प्रशिक्षण एक अभिनव उपक्रम आहे, असेही अश्विनी भिडे यांनी नमूद केले.

नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण हे प्रत्यक्ष कृतीवर आधारित- सहआयुक्त अजित कुंभार

विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठीदेखील शिक्षण विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग असलेले नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण हे प्रत्यक्ष कृतीवर आधारित असल्याने, मुख्याध्यापकांनी त्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी केले.

मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणारी ही एकमेव महानगरपालिका- शिक्षणाधिकारी

जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्सारख्या नामांकित संस्थांद्वारा मुख्याध्यापकांना असे प्रशिक्षण देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. तर, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी मुंबई महानगरपालिकेसोबत मिळून असा उपयुक्त उपक्रम राबवत असल्याबद्दल शिक्षणाधिकारी  राजेश कंकाळ यांनी नमूद करत आनंद व्यक्त केला.
उपशिक्षणाधिकारी मालती टोणपे आणि त्यांच्या सहका-यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले प्रशासकीय अधिकारी किसन पावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.