मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात संपूर्ण मुंबईतील सर्व निवासस्थानांवरती भारतीय एकात्मकतेचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग स्तरावरुन सुमारे ५० लाख तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. तसेच या कालावधीत मरिन ड्राईव्ह किनारी महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘लेझर शो’ केला जाणार आहे.
मुंबई महानगरात अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्व तयारीचा
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील राज्यभरात ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरात अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी होत असलेल्या पूर्व तयारीचा महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका मुख्यालयात कार्यान्वयन समितीची बैठक घेवून शुक्रवारी, 22 जुलै रोजी आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्यासह सर्व परिमंडळांचे सहआयुक्त / उपआयुक्त, संबंधित उपआयुक्त व सहायक आयुक्त आदी या बैठकीस उपस्थित होते.
नागरिकांनी स्वेच्छेने तिरंगा राष्ट्रध्वज फडकवावा
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येक घरी, प्रत्येक इमारत तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, विविध संस्था, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी स्वेच्छेने तिरंगा राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून त्यांना प्रोत्साहित करावयाचे आहे. या अनुषंगाने, व्यापार, व्यवसाय, उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची तसेच स्वयंसहाय्यता गट, बचत गट आणि इतर क्षेत्रांमधील स्वयंसेवक अशी निरनिराळ्या घटकांची मदत घेवून सर्व स्तरावरील नागरिकांमध्ये जनजागृती करावी. अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या कुटुंबे/घरे/ इमारती यांची संख्या निश्चित करुन त्यानुसार ध्वज उपलब्ध करणे, राष्ट्रध्वज पुरवठादारांशी समन्वय साधून वितरण करणे, वितरणासाठी ठिकाणे निश्चित करणे, या सर्व बाबींवर होत असलेल्या कार्यवाहीचा आयुक्तांनी आढावा घेतला. राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून हे अभियान राबविण्यासाठी विविध क्षेत्रातील संस्था व स्वयंसेवकांची मोठी मदत होईल, तसेच मुंबईतील सुमारे ३५ लाख निवासस्थाने व विविध आस्थापना असे मिळून सुमारे ५० लाख तिरंगा लावण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीदरम्यान दिले.
(हेही वाचा ओबीसी आरक्षण : १३ महानगरपालिकांसाठी नव्याने सोडत काढणार)
जनजागृती करणारे संदेश प्रसारित करावे
या अभियानाला व्यापक लोकसहभाग मिळावा यादृष्टीने विविध क्षेत्रांमधील संस्थांसह, स्वयंसहाय्यता गट, बचत गट, स्वयंसेवक यांचेदेखील सहाय्य घ्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या शाळा, विविध कार्यालये, रुग्णालये, उद्याने आदी ठिकाणी याबाबत जनजागृती करणारे संदेश प्रसारित करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अभियानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रसिद्धी माध्यमे व समाजमाध्यमांचाही उपयोग करावा. केंद्र शासनाकडून व महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येणा-या सुचनांनुसार कार्यवाही करावी, असेही डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community