मराठी अस्मिता आणि कडवट हिंदुत्व, ही शिवसेनेची खरी ओळख. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संग केल्यापासून ती पुसत चालली आहे. हाच धागा पकडून एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी करीत वेगळी चूल मांडली. शिवसेना विधिमंडळ पक्षात जवळपास ९० टक्के फूट पाडण्यात यश मिळाल्यानंतर आता उद्धवसेनेकडून ‘हिंदुत्ववा’चा मुद्दाही हायजॅक करण्याचा प्रयत्न शिंदेंकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते लवकरच अयोध्या दौरा करणार असून, यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे.
( हेही वाचा : मृतात्म्यांपासून रक्षण होण्यासाठी पोलीस ठाण्यात बळीची प्रथा! पोलीस प्रशासन करणार कारवाई )
उत्तर भारतीय मंचाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्यला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अयोध्येला जाण्यासाठी अनुकूल असून, मंत्रिमंडळ विस्तारानंतर तारीख निश्चित केली जाऊ शकते. यावेळी शिंदे गटातील आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतील. रेल्वे आणि रस्ते मार्गाने कार्यकर्त्यांना अयोध्येला पाठवण्याचे नियोजन केले जाणार आहे.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर १५ जून रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अयोध्येला जात मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. स्वतः एकनाथ शिंदे यांनी त्याचे नियोजन केले होते. त्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेतील ४० आमदार फोडत त्यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. हिंदुत्व हा या सत्ताबदलामागील प्रमुख धागा होता. त्यामुळे हिंदुत्व ठळकपणे दर्शविण्यासाठी शिंदे गटाकडून अयोध्या दौऱ्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसैनिकांना घालणार भावनिक साद
अयोध्येतील राम मंदिराशी शिवसेनेचे भावनिक नाते जोडले गेले आहे. ठाकरे परिवारातील सदस्य वेळोवेळी अयोध्या दौरा करीत, शिवसैनिकांना त्याची प्रचिती करून देत असतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्त्वाला तिलांजली दिल्याचा आरोप भाजप आणि मनसेकडून केला जात होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा करीत, आम्ही हिंदुत्त्वाशी तडजोड केली नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतलेल्या शिंदेंना अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याची संधी मिळणार आहे.