आमदार कांदे यांनी केलं स्पष्ट; त्यांना ठाकरेंचं नेतृत्व नकोय!

145

सध्या आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढत आहेत. आमदारांनी उठाव केल्यानंतर आपल्या बाजूने कोण आहेत याचा अंदाज ते घेत आहेत. आदित्य ठाकरे जिथे जातात तिथे गद्दार हा शब्द उच्चारत आहेत. तर यावर “आम्ही गद्दारी केली नाही. पक्षातून फुटलो नाही तर नेत्या विरोधात उठाव केला आहे. तुमचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही” असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.

राजकारणात विठ्ठलावर टीका न करता बडव्यांवर टीका

तुमचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही, हे आव्हान संजय राऊत किंवा मातोश्रीवरच असणारे मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी नसून थेट ठाकरे कुटुंबासाठी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. संजय राऊत जे बोलतात किंवा मिलिंद नार्वेकर जे करतात ते उद्धव ठाकरेंना हवे असते हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे संजय राऊतांवर केलेली टिका ही ठाकरेंवर केलेली असते. परंतु विठ्ठलावर टीका केल्याने भक्त नाराज होऊ शकतात. म्हणून राजकारणात थेट विठ्ठलावर टीका करण्याऐवजी बडव्यांवर टीका केली जाते.

ही राजाला एकटं पाडण्याची एक पद्धत आहे. जी राजकारणात सर्रास केली जाते. हीच युक्ती शिंदेंची शिवसेना वापरत आहे. आणि ही बुद्धी दुसरीकडून आलेली आहे. आणि अतिशय नियोजन पद्धतीने खेळ खेळला जात आहे. उठाव केलेला कोणताही आमदार ठाकरेंवर टीका करत नाही. पण ती टीका ठाकरेंवरच आहे हे ठाकरेंना माहिती आहे आणि राजकारणाचा अभ्यास असलेल्यांना देखील हे माहिती आहे.

(हेही वाचा – सोलापूर-गाणगापूर ST चा अपघात: ट्रॉमा केअर सेंटरचा विषय मार्गी लावणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द)

“मातोश्री बद्दल आजही आदर आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अपशब्द बोलणार नाही याची आम्ही शपथ घेतली असल्याचे कांदे यांनी सांगितले. आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. मात्र, त्यांच्याबाबत बोलण्यास गेलो तेव्हा मात्र उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतले नसल्याचा आरोप केला.” असं विधान कांदे यांनी केलं. आता याला काय अर्थ आहे सांगा? राष्ट्रवादीने अन्याय केला आणि उद्धव ठाकरेंनी तक्रार ऐकून घेतली नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की उद्धव ठाकरेंनी अन्याय केलेला आहे आणि उद्धव ठाकरे हे आम्हाला नेता म्हणून नकोत असं सुहास कांदे यांना म्हणायचं आहे.

त्यामुळे ज्यांना असं वाटत आहे की संजय राऊतांना वैतागून सगळे गेलेत तर हे चुकीचं आहे. कारण राऊत तेच बोलतात जे ठाकरेंना हवं आहे किंवा राऊतांनी म्हटलेलं ठाकरेंना आवडतं. म्हणून मूळ समस्या ही ठाकरे आहे आणि आमदारांनी ठाकरेंच्या विरोधात उठाव केला आहे. फक्त नाव संजय राऊतांचं घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.