शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेच्या शिवडी येथील शाखेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधत शिवसैनिकांना जोमाने उभे राहण्यासाठी आवाहन केले. पण याचवेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वाबाबत स्पष्टीकरण देखील दिले आहे.
दोन वाक्यांत उत्तर
मला कायम विचारण्यात येतं की शिवसेनेच्या आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक काय आहे. याचं उत्तर दोन वाक्यांत आहे. शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजपकडून राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करण्यात येत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे ही पैसा विरुद्ध निष्ठा अशी लढाई आहे. पण त्यांनी कितीही पैसा ओतला तरी शिवसैनिकांची निष्ठा त्यांना पुरून उरेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचाः ‘हिंमत असेल तर स्वतःच्या आई-वडिलांना घेऊन मतं मागा’, उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान)
वाढदिवशी मला ‘ही’ भेट द्या
हे जे कारस्थान आहे त्याला केवळ जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. त्यासाठी मला माझ्यासह प्रत्येक पदाधिका-याचं शपथपत्र हवं आहे. त्यानंतर सदस्य नोंदणीसाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोन दिवसांनी माझा वाढदिवस आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझ्या वाढदिवशी भेट म्हणून काही द्यायचं असेल तर मला फुलांचे गुच्छ नकोत. मला सदस्यांच्या अर्जांचे आणि पदाधिका-यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहेत, तीच माझी भेट असेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. त्यामुळे त्यांनी कितीही पैसा ओतला तरी माझ्या शिवसैनिकांचं वैभव त्याला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
जिथे शिवसैनिक, तिथे सत्ता
आम्हाला गद्दार म्हणू नका अशी विनंती आता त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पण आम्ही तुम्हाला गद्दार म्हणत नाही तर तुमच्या हातांनी तुमच्या कपाळावर तुम्ही जो शिक्का मारुन घेतला आहे तो बोलतोय. जे सोडून गेले आहेत त्यांच्यासोबत सच्चा शिवसैनिक गेलेला नाही. त्यांना वाटलं होतं जिथे सत्ता असते तिथे शिवसैनिक येतो, पण तसं नाही जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल खरे ‘माफीवीर’! कारवाईला घाबरुन अनेकदा टेकले गुडघे)
खरा भगवा कोणाचा हे दाखवून द्यायची गरज
लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. बाप्पाला मी साकडे घालतो की तुझ्या आगमनाच्या आधी हे जे संकट आहे ते तोडून मोडून पुन्हा तुझ्या शिवरायांचा भगवा, शिवसेनेचा भगवा हा तेजाने, आधीपेक्षाही अधिक जोमाने महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर फडकू दे. कारण खरा भगवा कोणता आहे हे आता दाखवून देण्याची वेळ आली आहे.
Join Our WhatsApp Community