रेल्वेच्या दुहेरीकरणाअभावी कोकणवासीयांचे प्रवासहाल

178

उन्हाळी सुट्ट्या, गणेशोत्सव, जत्रा आणि सणासुदीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या खच्चून भरलेल्या दिसतात. अलिकडे हंगामेतर काळातही कोकण रेल्वेचे तिकीट मिळवताना कसरत करावी लागते. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात असली तरी, एकेरी मार्गिकेमुळे त्यात अडचणी येत आहेत. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढायचा झाल्यास दुहेरीकरणाशिवाय पर्याय नाही. परंतु, निधीची कमतरता आणि नैसर्गिक अडथळ्यांमुळे त्यात आडकाठी निर्माण झाली आहे.

दुहेरीकरणाचा मार्ग अवघड

कोकण रेल्वेमार्ग हा डोंगर दऱ्यांतून जातो. या मार्गावर १ हजार ८१९ छोटे-मोठे पूल आणि ५९२ लहानमोठे बोगदे आहेत. तेथे दुसरा ट्रॅक बसविणे अभियांत्रिकी दृष्टीने अतिशय आव्हानात्मक आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या बोगद्यांच्या ठिकाणी खोदकाम केल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहचू शकते. त्यामुळे दुसरे बोगदे खोदताना अंतर नियम पाळण्यासह आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, शासनाकडून किमान २० हजार कोटींचा निधी मिळत नाही, तोवर दुहेरीकरणाला हात घालणे शक्य होणार नसल्याची माहिती कोकण रेल्वे मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

(हेही वाचाः परशुराम घाटाने अडवला मुंबई-गोवा हायवे)

प्रवाशांची मागणी

त्यावर मात करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत कोकण रेल्वे मार्गावर १० क्रॉसिंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. तेथे दोन ट्रॅकची व्यवस्था असून, दोन स्थानकांमधील अंतर कमी झाल्याने मेल-एक्स्प्रेसचा प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. मात्र, दिवसागणिक वाढणाऱ्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ही उपाययोजना तितकीशी फायदेशीर ठरताना दिसत नाही. विशेष गाड्या वगळता सध्या कोकण रेल्वे मार्गावर दिवसाला ४४ मेल आणि एक्स्प्रेस धावतात. चतुर्थीला गाड्यांची संख्या वाढवण्यात येत असली, तरी एकेरी मार्गिकेच्या वहनक्षमतेपेक्षा ती अधिक असल्याने वेळापत्रकावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नव्या सरकारने कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी केंद्राकडे व्यापक पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

दुहेरीकरण कितपर्यंत झाले?

रोहा ते ठोकूर असा ७०० किलोमीटर कोकण रेल्वेचा मार्ग आहे. मात्र, सध्या वीर ते रोहा अशा ४६ किलोमीटर मार्गाचेच दुहेरीकरण झाले आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवल्यास वेळापत्रक कोलमडते.

विद्युतीकरणात अव्वल

विद्युतीकरणात कोकण रेल्वेने मोठा टप्पा पार केला आहे. देशातून एकूण ३७ रेल्वेची वाहतूक कोकणात होते. यामध्ये डिझेल इंजिनाचा समावेश असल्याने धुरामुळे प्रदूषण होते. रेल्वेगाडीला एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो. त्यामुळे डिझेल मोठ्या प्रमाणात लागते. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना डिझेल लोकोची गरज लागत असल्याने इंधनावरही वर्षाला १५० ते २०० कोटी रुपये खर्च होत होता. विद्युतीकरणामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबर आर्थिक बचत होईल. शिवाय मेल, एक्स्प्रेस गाड्यांना विद्युतवरील इंजिन जोडल्यास काहीसा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.