एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर, राष्ट्रवादीला होणार का फायदा? 

193
भाजपावर आणि विशेषत: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेले एकनाथ खडसे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोरदार सुरु असताना आता खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील या बड्या नेत्याला पक्षात घेण्याबाबत चर्चा झाली.

खडसेंचा राष्ट्रवादीला किती फायदा

उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे अजूनही वजन आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संकटमोचक गिरीष महाजन यांना मोठे करण्यासाठी खडसेंना वेळोवेळी दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने जर खडसेंना पक्षात प्रवेश दिला तर भाजपाविरोधातील अस्त्र म्हणून खडसेंचा वापर होऊ शकतो. तसेच खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला वाढता येईल एवढेच नाही तर फडणवीस यांचे संकटमोचक असलेल्या गिरीष महाजन यांना देखील शह देता येईल असे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सांगतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर खडसे राष्ट्रवादीमध्ये आले तर देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देण्यासाठी खडसेंचा वापर केला जाऊ शकतो.

माझ्या आयुष्यात राजकारणाची किंवा व्यक्ती समजण्यासाठी थोडी समज असेल तर एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही. खडसेंचे काम विचारासाठी आहे ते व्यक्तीसाठी नाही. खडसेंना विधानसभा निवडणुकीवेळीही अनेक ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांच्या विचाराची श्रद्धा अतूट आहे. संवादाच्या माध्यमातून सगळे प्रश्न सुटतील. आमच्या आधीपासून त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केले आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान आहे. भाजपा पक्ष नाही तर परिवार आहे, असे विचार मनात आणू नका.

  • – सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री 

खडसेंना करावी लागणार तडजोड 
याआधी देखील एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी खडसेंना जे अपेक्षित आहे ते देण्यासारखे काही नाही असे राष्ट्रवादीने सांगितले होते. त्यामुळे आता खडसेंना राष्ट्रवादी जे देईल ते मान्य असेल का? आणि खडसे तडजोड करण्यास तयार होतील का? यावर खडसेंच्या प्रवेशाची चर्चा पुढे जाऊ शकते. मात्र एकंदरीत खडसेंची वक्तव्ये पाहाता खडसे भाजपामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळले असून, ते निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

खडसेंचे फडणवीसांवर आरोप

गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले असून, जे काही कटकारस्थान रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनीच रचले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काय काय उद्योग केले ते मला माहिती आहेत. मी पक्षाच्या विरोधात भाषा केली नाही. मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. तसेच माझ्यावर जी मीडिया ट्रायल झाली होती ,ते या बारभाई कारस्थानतूनच झाली. देवेंद्र फडणवीस यांनीच माझे तिकीट कापले. सर्व कटकारस्थान यांचेच आहे. मी सर्व बाबी नानासाहेब फडणवीस यांचे बारभाई कारस्थान या पुस्तकात देणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. तसेच एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली, मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला होता. विशेष म्हणजे फडणवीस यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली त्याबद्दल शुभेच्छा देत खडसेंनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपात युती आहे. त्यामुळे आमचे सरकार येईल, अशी आशा व्यक्त केली होती. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, त्यांनी महाराष्ट्रात जे राजकारण खेळले, याचे तिकीट कापायचे, त्याचे तिकीट कापायचे, याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असे तिथे होऊ नये, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीस यांना चिमटा काढला होता.

‘नाथाभाऊ पक्की कुस्ती खेळा’

दरम्यान खडसेंच्या नाराजी नाट्यावर शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आता नाथाभाऊ पक्की कुस्ती खेळा असे सांगत खडसेंना समर्थन दिले होते. एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचे कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने रचले आहे. मात्र एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असे व्हायला नको असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.