शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, अशा आरोपातून सोमवारी, खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील रूईकर कॉलनीतील घरावर शिवसैनिक धडकले. यावेळी मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर खासदार मानेंच्या घराजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असल्याने रूईकर कॉलनी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – Aarey Metro Carshed: आरे कॉलनी मार्गावरील वाहतूक 24 तासांसाठी बंद, असा असणार पर्यायी मार्ग)
दरम्यान, धैर्यशील माने यांनी शिवसैनिक व मतदारांच्या भावनांचा अपमान केला असून त्यांच्या कोल्हापूर येथील कार्यालय आणि घरावर धडक मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, आज खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा धडकला. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनापासून हा मोर्चा सकाळी सुरू झाला. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सामील झाले होते.
या मोर्च्यादरम्यान, शिवसैनिकांकडून मोठ्याप्रमाणात जोरदार मानेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, शिवसैनिक मानेंच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या तिनही जिल्हाप्रमुखांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. यावेळी काही काळ शिवसैनिकांची पोलिसांशी झटापट झाली. तब्बल ४०० पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ४०० मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मार्चा रोखला. मात्र शिवसैनिक धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्याच्या भूमिकेवर ठाम असून आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले.