कोरोना संसर्गामुळे सुमारे दोन वर्षे बंद असलेला मोडी लिपीचा प्रशिक्षण वर्ग रविवारी २४ जुलै २०२२ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या ‘टीम मोडी’ने सुरू केला आहे. यामुळे बहुतांशी मोडीमध्ये असणारी महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासातील कागदपत्रे वाचून, लोकांसमोर त्यांचा इतिहास परिपूर्णपणे आणण्याचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे. दादरचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या निमित्ताने अनेक ऐतिहासिक दस्तावेज मोडी लिपी शिकणाऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे. याचा इतिहास संशोधनासारख्या महत्त्वाच्या कामी उपयोग होऊ शकणार आहे. यामुळे इतिहासाची कोणीही तोडमोड करून कोणतीही विधाने कोणाविरुद्ध होण्यापासून टळली जातील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांनी मोडी प्रशिक्षण सुरू
महाराष्ट्रात अगदी इ. स. १२०० सालापासूनचा मोडी लिपी वापराचा कालखंड पाहिल्यास मोडी लिपीमधून विविध राजवटींमधील तसेच सत्तांमधील विविध प्रकारचा पत्रव्यवहार, राज्य कारभार, प्रशासन आदीसाठी वापर केला गेला. त्यामुळे अशा प्रकारच्या मोडी प्रशिक्षणामुळे लोकांना आणि विशेष करून नवीन पिढीला याची माहिती होईल. या प्रमुख उद्दिष्टाने सावरकर स्मारकाने मोडी लिपीच्या प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी दिली आहे.
( हेही वाचा : राज्यात पासपोर्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन; कामकाज ठप्प, नागरिकांचा संताप)
दर रविवारी सावरकर स्मारकात आता हा मोडी प्रशिक्षणाचा वर्ग ‘टीम मोडी’ने सुरू केला आहे. दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत हे वर्ग सुरू झाले आहेत. बुधवार, दिनांक १३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ गुरुपौर्णिमेच्या दिनी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा आरंभ दादरच्या सावरकर स्मारकात करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community