आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी झाडांची कत्तल सुरू असल्याचे वृत्त समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यानंतर सोमवारी एकच खळबळ उडाली. मात्र, आरेमध्ये कोणत्याही प्रकारची झाडे तोडण्यात आली नसून, मेट्रोचे डबे सुरक्षितरित्या आत आणण्यासाठी केवळ फांद्यांची छाटणी करण्यात आली, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडण्यामागे काय आहेत कारणे आणि कोण आहेत जबाबदार?)
फांद्यांची छाटणी केल्याची माहिती
भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर येताच आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच आरेतील मेट्रो कारशेडवरील बंदी उठवली. मात्र, सोमवारी अचानक आरेतील रस्ता बंद केल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला. झाडे तोडण्यासाठीच हा रस्ता बंद केल्याची माहिती काहींनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली. मात्र, एकही झाड तोडण्यात आले नसून, केवळ मेट्रोच्या डब्यांची वाहतूक करण्यासाठी फांद्यांची छाटणी केल्याची माहिती मेट्रो प्रशासनातर्फे देण्यात आली.
मरोळ-मरोशी रोड ते मरोळ भूमिगत स्थानकादरम्यान चाचणी होणार
आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील कारखान्यातून सात दिवसांपूर्वी मेट्रो गाडीचे आठपैकी दोन डबे रस्तेमार्गे मुंबईला रवाना झाले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत ते मुंबईत दाखल होतील. मोठ्या ट्रेलरवरून हे डबे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये आणले जातील. मरोळ-मरोशी रोड ते मरोळ भूमिगत स्थानकादरम्यान ही चाचणी होणार आहे. यात २२५ मीटर पृष्ठभाग आणि उताराचा समावेश असून, उर्वरित भाग बोगद्यात असेल. प्रोटोटाइप गाडीची १० हजार किमी चाचणी ३ किमी अंतरावर घेतली जाईल. यात गाडीचा वेग, ऑसिलेशन आणि इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स (ईबीडी) यासह इतर प्रणालींच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community