शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी मंगळवारी, 26 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे आमदार-खासदारांपाठोपाठ आता ठाकरे घराण्याच्या सूनबाई शिंदे गटात जाणार का, याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची भेट घेणाऱ्या स्मिता या ठाकरे कुटुंबातील पहिल्याच व्यक्ती आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात दीर-भावजय असे नाते असले, तरी दोन्ही कुटुंबात सख्य नाही. त्या सामाजिक कार्य आणि चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना नुसता त्रास दिला, एक दिवस महाराष्ट्राला सगळे सांगेन! नारायण राणेंचा इशारा)
भेट लक्षवेधी ठरली
उद्धव सेनेकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्मिता ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट लक्षवेधी ठरली आहे. माध्यमांनी त्यांना याबाबत विचारले असता स्मिता म्हणाल्या, आमचे जुने शिवसैनिक आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखते. ते ज्या खुर्चीवर बसले आहेत, त्याचा आदर करते. त्यांनी शिवसेनेत किती योगदान दिले आहे तेही मला माहीत आहे. मी त्यांना आदराने बघते. मी कुटुंबवगैरे पाहिले नाही, तर एक व्यक्ती म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community