अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीला तुरुंगात फुशारक्या मारणे चांगलेच महागात पडले आहे. बॅरेकमधील इतर कैद्यांना या हत्याकांडाचा तपशील सांगत असताना झालेल्या वादातून बॅरेकमधील कैद्यांनी उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीला चोप दिल्याची घटना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात घडली. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपीना दुसऱ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे.
काय घडलं नेमकं
अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या ७ आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी शाहरुख पठाण हा आरोपी बॅरेक क्रमांक ७ मध्ये आहे. २३ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बॅरेक क्रमांक ७ मधील काही कैदी एकत्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी शाहरुख पठाण हा देखील त्यांच्यात सामील झाला, व त्याने देखील उमेश कोल्हे याची हत्या कशी केली? याबाबत फुशारक्या मारू लागला. त्याच्या फुशारक्या ऐकून काही कैद्यांना राग आला आणि त्यांनी शाहरुख पठाण यांच्यासोबत हुज्जत घातली, त्यात पठाण याने देखील त्यांना अरे ला कारे केल्यामुळे वाद वाढला व ५ कैद्यांनी मिळून पठाण याला चोप द्यायला सुरुवात केली.
( हेही वाचा: …तर मग स्मारकासाठीचे 500 कोटी स्वत:च्या खिशातून खर्च करा; भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावले )
बॅरेकमध्ये झालेल्या हाणामारीची माहिती मिळताच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तुरुंग रक्षकांनी बॅरेककडे धाव घेऊन पठाण याची ५ जणांच्या तावडीतून सुटका केली. तसेच, ताब्यात घेण्यात आलेल्या ५ कैद्यांना तात्पुरते वेगवेगळ्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी या प्रकरणी ना. म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी ५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community