27 जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक नेत्यांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री असा केला आहे.
त्यामुळे यावरुन आता चर्चा होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांमध्ये त्यांनी शिंदे आणि फडणवीसांकडून राहिलेली उणीव भरुन काढली असल्याचे म्हटले जात आहे.
पवारांनी दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त ट्वीट करत शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. पण शरद पवार यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी आणि भावी संकल्पनांसाठी देखील शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! श्री. ठाकरे यांना निरोगी दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना! pic.twitter.com/QXjMrayZbg
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 27, 2022
(हेही वाचाः उद्धव ठाकरेंना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ का म्हटले नाही? या प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे)
ते सन्मानाचे पद
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख न केल्याने त्याचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री पद हे सन्मानाचे पद आहे त्यामुळेच त्या पदाचा उल्लेख करण्यात आल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community