पावसाच्या गैरहजेरीने आता राज्यभरात तापमानात वाढ होत असल्याचा अनुभव येत आहे. राज्यातील बहुतांश भागांत आता तापमानाने तिशी ओलांडल्याचे बुधवारच्या तापमान नोंदीत आढळले. सोलापूरात कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान होते. रविवारपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचाही अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जाहीर केला.
( हेही वाचा : भातसा प्रकल्पासाठी १ हजार ४९१ कोटींच्या कामांना सुधारित मान्यता )
राज्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद
राज्यात पावसाची कुठलीही चिन्हे नसताना एकट्या पुण्यात वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली. पुण्यात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत ४५.६ मिमी पाऊस पडला. महाबळेश्वरमध्येही कमाल तापमानात तीन अंशाने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. महाबळेश्वरमध्ये २१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. संपूर्ण मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशाने वाढ झाल्याचे पहायला मिळाले. पावसाचा मारा होऊनही पुण्यात कमाल तापमान ३१.३ , सांगलीत ३०.३ तर सोलापूरात ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
कोकणात डहाणू येथे ३०.७, रत्नागिरीत ३०.५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानात वाढ झाली. तिशीपार केलेल्या वेधशाळेच्या स्थानकांमध्ये मराठवाड्यात औरंगाबादमध्ये ३० तर परभणीत ३०.२, विदर्भात अकोल्यात ३०.९, गोंदियात ३०, नागपूरमध्ये ३०.६ तर ब्रह्मपुरीत कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान नोंदवले गेले. सोलापूर खालोखाल ब्रह्मपुरीत कमाल तापमान सर्वात जास्त होते. गुरुवारी आणि शुक्रवारी भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात दोन दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकटाट राहील. गुरुवारी केवळ यवतमाळ येथे मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल.
Join Our WhatsApp Community