पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुरूवारी, शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. त्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
(हेही वाचा – Voter ID: आता 17 व्या वर्षी बनवता येणार मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा निर्णय)
शिवबंधन बांधताना अंधारे भावूक
शिवबंधन बांधताना सुषमा अंधारे या भावूक झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, शिवसेनेत मी नवीन आहे, ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे या माझ्यासाठी नेहमीत आदर्श राहिल्या असून पक्षात त्या मला आईसारख्या संभाळून घेतील. तसेच शिवसेनेतील नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तसेच आज गळे काढून रडायचं आणि उद्या दुसऱ्या गटात सामील व्हायचे, असेही होणार नाही, असा टोला देखील शिंदे समर्थकांना त्यांनी लगावला आहे.
म्हणून शिवसेनेत जाण्याचा घेतला निर्णय
पुढे त्या असेही म्हणाल्या की, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथे संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशावेळी भाजपविरोधात झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही धर्मनिरपेक्षतावादी लोकांनी असले पाहिजे, असे मला प्रामाणिकपणे वाटत आहे म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community