VVIP व्यक्तींसाठी मुंबई पोलीस खरेदी करणार बुलेटप्रूफ वाहने

146
मुंबई पोलिसांकडे पुरेशी बुलेटप्रूफ वाहने नसल्यामुळे मुंबईत येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे १० बुलेटप्रूफ वाहने व २० नियमित वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हे नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. त्यात या शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सतत वर्दळ सुरू असते. या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. या व्यक्ती मुंबईत दाखल झाल्यापासून ते परत जाईपर्यंतची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून त्यांना पुरवली जाते. मात्र एवढ्या मोठ्या जबाबदारीला तोंड देण्यासाठी मुंबई पोलिसांकडे अवघी तीन बुलेटप्रूफ वाहने आहेत. परंतु ही वाहनेदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या दिमतीला असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा ताफ्यात बुलेटप्रूफ वाहने नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून १० बुलेटप्रूफ वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

( हेही वाचा: गुगल मॅप घेऊन आलंय ‘हे’ भन्नाट फीचर; घरबसल्या समजणार रस्ते बंद की चालू )

…म्हणून बुलेटप्रुफ गाड्या खरेदीचा प्रस्ताव सादर केला
झेड -प्लस सुरक्षा उपभोगणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये भारताचे राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परदेशी मान्यवर आणि काही खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले, “मुंबई पोलिसांकडे तीन बुलेटप्रूफ वाहने आहेत, जी झेड प्लस संरक्षणासाठी वापरली जातात. शक्यतो ही वाहने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांसाठी वापरली जातात. त्यामुळे जेव्हा जेव्हा चौथा व्हीव्हीआयपी शहरात येतो, तेव्हा राज्याच्या इतर भागातून बुलेटप्रूफ वाहने आणण्यासाठी चकरा माराव्या लागतात.” असे  निदर्शनास आले. पोलीस महासंचालक  कार्यालयदेखील बुलेटप्रूफ वाहनांसाठी परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे. मुंबई पोलिसांनी स्वतःची बुलेटप्रूफ वाहने घेण्याचा प्रस्तावदेखील सादर केला आहे, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. २०११-१२ मध्ये सध्याची बुलेटप्रूफ वाहने बदलण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मात्र तो स्वीकारण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या हा प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे आहे आणि यावेळी तो स्वीकारला जाईल यासाठी मुंबई पोलीस सकारात्मक आहेत. सूत्रांनी सांगितले की, काही वेळा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ( व्हीव्हीआयपी) त्यांच्या एस्कॉर्टसह येतात, तेव्हा मुंबई पोलिसांनी दिलेली वाहने महिंद्रा बोलेरो किंवा टाटा सुमो असतात. जी या वाहनांशी जुळत नाहीत. त्यामुळे या यादीत आणखी २० टोयोटा फॉर्च्युनर्सची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.