भारताचे विद्यमान सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मराठमोळे सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले न्या. उदय उमेश लळीत भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुढील महिन्यात शपथबद्ध होऊन २७ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारतील. महाराष्ट्राचा सुपुत्र देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदी बसणार असल्याने मराठी जनांसह सिंधुदुर्गकरांसाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. असे असले तरी लळीत सरन्यायाधीश म्हणून अवघ्या ७४ दिवसांसाठी जबाबदारी स्वीकारतील. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होणार आहेत.
२०१४ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश
न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर आहे. लळीत यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ रोजी झाला असून ते सध्या त्यांचे वय ६४ वर्षे आहे. जून १९८३ मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. दिवंगत ज्येष्ठ वकील एम.ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे त्यांनी वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले. तब्बल सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्षे लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत आहेत. १३ ऑगस्ट २०१४ पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. मितभाषी, निर्गवी आणि सदा हसतमुख अशी त्यांची ओळख सर्वश्रृत आहे. त्यांच्या व्यावसायिक सामर्थ्याचे वर्णन ‘प्रकरणातील कसूनपणा, कायदेशीर प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात संयम आणि खंडपीठासमोर केस मांडताना संयम’ असे वर्णन केले जाते. न्यायमूर्ती ललित हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे सहावे ज्येष्ठ वकील आहेत.
(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवरून राष्ट्रीय कार्यकारिणी ‘बरखास्त’! उरली फक्त घराणेशाही)
विशेष पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून नेमणूक
लळीत हे गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयात हाय प्रोफाईल प्रकरणे चालवूनही प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत. माजी केंद्रीय दळणवळण मंत्री ए राजा यांच्यासह अनेक बड्या असामी आरोपी असलेला 2G स्पेक्ट्रम घोटाळा हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा भ्रष्टाचाराचा खटला त्यांनी चालवला. तेव्हा ८० हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी सुमारे १.७० लाख कोटी रुपयांच्या 2G स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित अभियोग चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये विशेष अधिकार वापरून ज्येष्ठ वकील उदय लळीत यांची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक करण्यात केली. ही महाराष्ट्राच्या आणि विशेषत: मुंबईच्या वकिली नैपुण्याची आणखी एक चोख पोचपावती म्हणावी लागेल. एवढेच नव्हे तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारीही त्यांना देण्यात आली. याशिवाय न्यायमूर्ती लळीत हे १३ जुलै २०२० रोजी श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते.
१४ राज्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे चालवली
२००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लळीत यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. देशभर असंख्य महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी आपल्या वकिली कौशल्याचा ठसा उमटवला आहे. देशभरातील बहुतांश उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद केले आहे. सात वर्षे ते महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात पॅनलवरील ज्येष्ठ वकील होते. आजवर त्यांनी देशातील सुमारे १४ राज्य सरकारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे चालवली आहेत.
तीन पिढ्या वकिली क्षेत्रात
लळीतांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्व जण वकिलीच करायचे. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक ‘एलसीपीएस’ डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय, चातुर्य आणि अभ्यासूवृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते १९७४ ते ७६ या काळात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.
Join Our WhatsApp Community