दीड कोटीच्या दरोड्याप्रकरणी चौघांना अटक

174

आठ महिन्यांपूर्वी दादर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दीड कोटीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात माटुंगा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी एक जण ज्या कंपनीचे सोनं लुटण्यात आले होते त्या कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बलराज अमर कटारी (२३), मारुती राठोड (२५),आनंद चव्हाण (२५) आणि ओमकार शिंदे (२४) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून चौघे सांगली जिल्ह्यातील विटा येथे राहणारे आहेत. दोन आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे.

मित्रांना एकत्र जमवून दरोड्याची योजना आखली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले चौघे आणि फरार असलेले दोघे हे बालपणाचे मित्र असून आनंद चव्हाण हा मुंबईत सोनं वितळून देणाऱ्या कंपनीत नोकरीला होता. ही कंपनी सोनं वितळवून त्याचे सोन्याचे बिस्कीट आणि विटामध्ये रूपांतर करून पुन्हा कोलकत्ता येथून मुंबईत आणून विकते. नोव्हेंबर २०२१ मध्ये या कंपनीने आनंद चव्हाण आणि गोरे या दोन कर्मचारी यांना कोलकत्ता येथून सोनं घेऊन येण्यासाठी पाठवले होते. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे हे दोघे हावडा एक्स्प्रेसने दादर टर्मिनस येथे उतरून स्वामींनारायन मंदिराच्या दिशेने जात असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी गोरे याला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून गोरेवर वार करून त्याचा ३ किलो सोन्याचे बिस्कीट असलेला पट्टा घेऊन पळून गेले होते. याबाबत कंपनीने याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही फिर्याद नोंदवली नव्हती. आठ महिन्यांनी कंपनीच्या मालकाला या लुटीबाबत माहिती मिळाली असता गेल्या आठवड्यात त्याने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

( हेही वाचा : महापालिका शाळांमधील मुलांना दप्तर खरेदीसाठी सुमारे ५१० ते ७६० रुपये मिळणार!)

माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करून संशयित कर्मचारी आनंद चव्हाण याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या दरोड्याचा मास्टर माईंड आनंद चव्हाण हा असून त्याने आपल्या बालपणीच्या मित्रांना एकत्र जमवून दरोड्याची योजना आखली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.