मुंबईत १८ ते ६९ वयोगटातील ३४ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास

145

धावत्या जीवनशैलीत अडकलेल्या मुंबईकरांमध्ये आता उच्च रक्तदाबाची समस्या वाढू लागली आहे. मुंबईतील १८ ते ६९ वयोगटातील तब्बल ३४ टक्के माणसांना उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. याबाबतचा तपशीलवार अहवाल येत्या आठवड्यात पालिका आरोग्य विभाग जाहीर करणार आहे.

( हेही वाचा : दादर रेल्वे स्थानकाचे रस्ते फेरीवालामुक्त, महापालिका आणि पोलिसांची विशेष धडक मोहीम )

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील जीवनशैलीमुळे विविध आजारांची संख्या वाढत असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणात आढळले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांमुळे रुग्ण मोठ्या संख्येने गमावल्याने जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात मधुमेह, उच्च रक्तदाब यावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा सुरु झाली होती. कोरोनावर मुंबईत यशस्वीरित्या मात केल्यानंतरही मुंबईत उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत असल्यावर पालिकेने ठोस उपाययोजना करण्याचे ठरवले. त्यातूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या दिल्ली येथील अधिका-यांनी मुंबईला भेट देत ५ हजार लोकांचे सर्वेक्षण केले. जागतिक आरोग्य संघटनेने निल्सन कंपनीच्यामार्फत हे सर्वेक्षण केले आहे.

सर्वेक्षणात काय तपासले?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी मुंबईत हे सर्वेक्षण केले. घराघरात जाऊन माणसांच्या शरीरातील साखरेची मात्रा, उच्चरक्तदाब, क्रीएटिन तसेच लघवीचे नमुनेही तपासणीसाठी घेतले गेले. यात मधुमेहाचीही तपासणी केली गेली. तीन टप्प्यात हे सर्वेक्षण झाले असून, लवकरच हा अहवाल पालिका जाहीर करणार आहे. यासह तंबाखूच्या आहारी गेलेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांबाबतही माहिती दिली गेली आहे.

मधुमेह, कर्करोग नियंत्रणावरही भर

येत्या काही महिन्यात पालिका रुग्णालयात मधुमेह, स्तन कर्करोग, मुखाचा कर्करोग तसेच गर्भाशयाचा कर्करोग यावरही तपासणी सुरु होणार असल्याची माहिती डॉ संजीवकुमार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.