मुंबईतील पावसाने १९८१ च्या आठवणी जागवल्या 

188
मुंबई – मंगळवारी रात्रीपासून पावसाने अक्षरशः रात्रपाळी केली. मुंबई शहर आणि उपनगरांना रात्रभर पावसाने इतके झोडपून काढले कि सकाळी उठल्यावर मुंबईचा बदललेल्या चेहरा मोहरा बघून पावसाने आपलाच ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला कि काय, असे मुंबईकरांना वाटले आणि त्यात तथ्यही आढळून आले. मुंबईत पडलेल्या या मुसळधार पावसाने १९८१ साली पडलेल्या पावसाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.

RAIN6

३९ वर्षांपूर्वीचा तोच दिवस आणि तीच दशा 

३९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २३ सप्टेंबर १९८१ रोजी मुंबईत विक्रमी ३१८.२  मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज २८६.४ एवढ्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तर सप्टेंबर महिन्यात जेवढा पाऊस होतो तेवढा एका दिवसात ८० टक्के पाऊस झाला आहे.

20200923 065822

वाहतुक व्यवस्था कोलमडली 

मुंबईतील या पावसामुळे चारही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या सायन, चुनाभट्टी, कुर्ला या स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे सीएसएमटी ते ठाणे, तर सीएसएमटी ते वाशी ही रेल्वे सेवा रद्द करण्यात आली होती. तर मुसळधार पावसामुळे चर्चगेट ते अंधेरी स्थानकादरम्यान रेल्वे सेवा रद्द करण्यात आली होती. पावसाचा परिणाम जसा रेल्वे वाहतूकीवर झाला तसाच परिणाम बस वाहतुकीवर देखील झाल्याचे पहायला मिळाले. मुंबईतील भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, हिंदमाता, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस या भागात पाणी साचले आहे. त्यामुळे बेस्ट बसची वाहतूक वळवण्यात आली आहे. सखल भागातील अनेक बेस्ट बस या उड्डाणपुलामार्गे वळवण्यात आल्या.

बीकेसीत सर्वाधिक पाऊस

मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद ही बीकेसीत झाली. बीकेसीमध्ये ३६६.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ धारावीत ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथे २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मालाडला २५७.२ मिमी पाऊस तर बोरिवलीत २०४.४ मिमी पाऊस गेल्या २४ तासात पडला. दक्षिण मुंबईत कुलाबा येथे १४७ मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात भांडूप येथे १८५ मिमी आणि चेंबूर येथे २०९ मिमी पावसाची नोंद झाली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.