द्रौपदीची विटंबना कलीयुगातले दुःशासनही करताहेत, काँग्रेसने माफी मागावी

135

सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस आपल्या हातात घेतल्यानंतर या पक्षाची अधोगती झाली आहे. अनेक महापुरुषांनी घडवलेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख संघटना असलेल्या कॉंग्रेस पक्षाची एका कुटुंबासाठी होत असलेली वाताहत बघवत नाही. सोनिया गांधींची मर्जी राखण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी वीर सावरकरांवर गलिच्छ आरोप तर केलेच, पण आता जनजाती समुदायातील एक महिला प्रचंड संघर्ष करुन राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोहोचली आहे याचं दुःख सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकार्‍यांना झालेलं आहे.

( हेही वाचा : सुषमा अंधारे शिवसेनेत आल्याने उजेड पडेल का? )

…अशी कॉंग्रेसची मानसिकता

राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यामुळे सोनिया गांधींना काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले. सोनिया गांधींची मर्जी राखल्यामुळे डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपद मिळालं, या सर्व प्रवासात संघर्ष करावा लागत नाही अशी कॉंग्रेसची मानसिकता झालेली आहे. शॉर्ट कट घेऊन तुम्ही मोठ्या पदावर पोहोचू शकता ही कॉंग्रेसची संस्कृती आहे. कॉंग्रेसमध्ये तुम्हाला मोठ्या पदावर पोहोचायला संघर्ष करावा लागत नाही. केवळ एका कुटुंबाप्रति निष्ठा राखली की तुम्हाला ते भरभरुन देतात, त्यासाठी कर्तृत्व गाजवायची गरज नाही.

द्रौपदी मुर्मू संघर्ष करुन स्वतःला सिद्ध करुन सर्वोच्च पदावर पोहोचल्या आहेत. सोनिया गांधींचे विश्वासू नेते अधीर रंजन यांनी सोनिया गांधींना खुश करण्यासाठी जरा जास्तच अधीरता दाखवली. त्यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्राची पत्नी असा केला. काँग्रेसने त्यांना कठपुतळी म्हटलं. कॉंग्रेसला अशा अनेक कर्तृत्ववान लोकांच्या अब्रूनुकसानीत समाधान वाटत आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी गलिच्छ आरोप केले. महाभारतात पवित्र अशा द्रौपदीची विटंबना केली. एका स्त्रीला भरसभेत खेचत आणलं.

द्रौपदीचा अपमान करणार्‍या दुःशासनाला शिक्षा होतेच

आज मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विटंबना कॉंग्रेस नावाचा दुःशासन करत आहे. सोनिया गांधी यांना प्रश्न विचारल्यावर त्या भडकतात. पण आपल्याच पक्षातल्या अधीर झालेल्या लोकांना गप्प करता येत नाही. त्यांना माफी मागता येत नाही. कॉंग्रेसने महापुरुषांचा आणि देशाचा इतक्या वेळा अपमान केला आहे की त्यांनी रोज सकाळी एकदा तरी माफी मागितली पाहिजे. सोनिया गांधी आणि त्यांच्या पक्षाला जनतेने नाकारले आहे. जनतेने त्यांना योग्य ती जागा दाखवली आहे. यापुढे कॉंग्रेसची अवस्था आणखी बिकट होणार आहे. कारण द्रौपदीचा अपमान करणार्‍या दुःशासनाला शिक्षा होतेच.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.