देशात मोदी सरकारने यशस्वी असा 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. केंद्रातील सत्तेत सलग दोन टर्म मोदी सरकार आहे. त्यामुळे मोदी लाट अजूनही कायम असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. याचबाबत आता इंडिया टिव्हीने केलेल्या एका सर्व्हेनुसार देशात पुन्हा एकदा मोदी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जर लोकसभा निवडणुका लागल्या तर भाजप संपूर्ण देशात रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवेल असा अंदाज इंडिया टिव्हीने केलेल्या मूड ऑफ नेशन या ओपिनियन पोलमधून व्यक्त होत आहे. जर देशात आता लोकसभा निवडणुका लागल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 362 तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 97 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर पक्ष व अपक्षांना 84 जागा मिळतील.
(हेही वाचाः लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात भाजप-शिंदे गट जिंकणार? काय सांगतो सर्व्हे)
या राज्यांत भाजपचे वर्चस्व
जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी इंडिया टिव्ही-मॅटराईजकडून हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकांपेक्षा जास्त जागा भाजपला 2024 मध्ये मिळतील असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश,राजस्थान या देशातील महत्वाच्या आणि जास्त लोकसभा जागा असणा-या राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू राज्यांत काँग्रेस आणि यूपीएची कामगिरी कायम राहणार असल्याचे या सर्व्हेतून समजत आहे.
काँग्रेसचे काय?
पंजाबमध्ये आप आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आपले वर्चस्व ठेवण्यात यश मिळेल, असे दिसत आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 80 पैकी 76, महाराष्ट्रात 48 पैकी 26 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेस पुरस्कृत यूपीएला मात्र सलग तिस-या निवडणुकीत संपूर्ण देशात दोन आकडी लोकसभा खासदारांवर समाधान मानावे लागणार असल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचाः आज बाळासाहेब असते तर खूश झाले असते, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया)
Join Our WhatsApp Community