मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड)च्या बांधकामांमधील प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यानच्या २.०७० किलोमीटर अंतराचा बोगद्याचे काम जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा एकदा टीबीएम मावळा दुसऱ्या लढाईसाठी स्वार झाला. गिरगाव ते प्रिय दर्शनी पार्कपर्यंतच्या दुसऱ्या समांतर बोगद्याच्या कामात मावळ्याने १०९ दिवसांमध्ये तब्बल १ हजार मीटरचा भूमिगत पल्ला पार केला आहे.
( हेही वाचा : ओबीसी आरक्षणानंतरही अनेकांच्या आनंदावर विरजण)
बोगद्याचे आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा २ किलोमीटरचा टप्पा जानेवारी महिन्यात पूर्ण झाला. आता उजव्या बाजुकडील भुयारी मार्गाचे काम जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण झाल्यानंतर आता छोटा चौपाटीपासून प्रियदर्शनी पार्कच्या दिशेने डावीकडच्या बाजूने मावळा आता बोगद्याचा मार्ग स्वार करायला निघाला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गिरगाव ते प्रिय दर्शनी पार्कपर्यंतच्या समांतर असलेल्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. बोगद्याच्या खोदकामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या बोगद्याचेही अंतर २.०७० किलोमीटर एवढे आहे.
आतापर्यंत १ हजार मीटर अंतराचे मार्गक्रमण करत पुढे वाटचाल सुरु ठेवली आहे. या दुसऱ्या बोगद्याचे आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
संयंत्राच्या आकाराचा केक कापून हा आनंद साजरा
दुस-या बोगद्याचे तब्बल १ हजार मीटरचे खोदकाम २९ जुलै २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे हे बोगद्याचे खोदकाम झाल्यानंतर त्यापाठोपाठ लगेचच उभारण्याचे काम देखील वेगात सुरु असून दुस-या बोगद्यात आतापर्यंत ४९५ कंकणाकृती कडे उभारण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली आहे. या निमित्ताने बोगद्यात काम करणा-या अभियंता व कामगार वर्गाने मावळा या संयंत्राच्या आकाराचा केक कापून हा आनंद साजरा केला.
कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे काम अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हाती आल्यापासून त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी कोस्टल रोडचे प्रमुख अभियंते मोहन माचीवाल, विजय निघोट आणि विद्यमान प्रमुख अभियंता चक्रधर कांडरकर यांच्या मदतीने महापालिकेने हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
Join Our WhatsApp Community