राज्यपालांकडून मराठी माणसाला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न – संजय राऊत

138

मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. राज्यपाल बोलत होते त्यातून त्यांनी मराठी माणसाला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी माणूस पैसा कमावत असेल तर तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. राज्यपालांच्या विधानाचा निषेध करून मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानी असल्याचे दाखवावे असे आव्हान राऊतांनी दिले आहे.

( हेही वाचा : ज्या विषयात कळत नाही, तिथे राज्यपालांनी चोमडेपणा करु नये; राज्यपालांच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक)

मराठी माणसाचं काहीच योगदान नाही का?

भाजपची विचारसरणी फक्त पैशांच्या मागे धावते. पैसेवाले म्हणजे राज्य, पैसेवाले म्हणजे राजकारण आणि पैसेवाले म्हणजेच देश ही भाजपची विचारसरणी आहे. असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा देश आहे. नानाशंकर शेट यांनी मुंबईचे वैभव वाढवले. या राज्यात पिढ्यानपिढ्या गुजराती बांधव राहतात त्यांचंही योगदान आहे. नानाशंकर शेट यांचे चरित्र आम्ही राज्यपालांना पाठवणार आहोत. मुंबई आर्थिक राजधानी कशी झाली, विकासाचं मॉडेल कशी बनली हे त्यांच्या चरित्रातून राज्यपालांनी वाचावे, असेही राऊत म्हणाले.

सावित्रीबाई फुलेंचा अपमान सुद्धा राज्यपालांनी केला आणि भाजपने तेव्हा तोंडात मिठाची गुळणी घेत गप्प राहणं पसंत केलं म्हणजे, मुंबईच्या जडणघडणेमध्ये मराठी माणसाचं काहीच योगदान नाही का श्रम करणाऱ्या मराठी माणसाविषयी एवढा द्वेष आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांचे ट्वीट

दरम्यान, संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट सुद्धा केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरु झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.