छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा तरुणांच्या रोजगारासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यात आली आहे. यात त्यांनी मराठा तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मांडला आहे. अनेक मराठा तरुणांची नोकरीसाठी निवड झाली परंतु मराठा उमेदवारांना त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे, त्याच पदांवरुन नियुक्ती द्यावी, हा माझा उपोषणाचा एक मुख्य मुद्दा होता. त्यावेळी मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन सरकारचे प्रतिनिधी म्हणून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. आता तोच शब्द पाळण्याची वेळ आली आहे. अतिशय संवेदनशील असणारा नियुक्त्यांचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सोडवावा, अशी फेसबुक पोस्ट संभाजीराजेंनी केली आहे.
( हेही वाचा: ‘ज्या दिवशी मी बोलेन तेव्हा भूकंप होईल’, मुलाखतीवरुन मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा )
छत्रपती संभाजींनी केले होते आमरण उपोषण
संभाजी छत्रपती यांनी काही मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी हे उपोषण केले होते. सरकारच्यावतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, त्यांनी उपोषण मागे घेतले. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि अमित देशमुख यांनी संभाजी छत्रपती यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्यांमध्ये आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत, असे एकनाथ शिंदे तेव्हा म्हणाले होते. यानंतर संभाजी छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी उपोषण सोडले. तेव्हा दिलेले आश्वासन पूर्ण व्हावे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.
Join Our WhatsApp Community