राजकीय सत्ता आणि वीर सावरकर…

162

महाराष्ट्राचं राजकारण खूप तापलेलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत आणि एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. सध्या संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. सत्ता गेल्यामुळे ठाकरेंच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. शरद पवारांची अस्वस्थता देखील लपून राहिलेली नाही. म्हणूनच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या ऋषीतूल्य व्यक्तीवर टीका केली. कारण सत्ता गेल्यामुळे आपण आपल्या मूळ राजकारणाकडे वळलेलं बरं, असा विचार पवारांनी केला असावा.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष केला

प्रत्येक नेते सत्ता आज आहे उद्या नाही असं म्हणताना दिसतात. पण प्रत्येकालाच सत्ता हवी असते. राजकारणी माणूस सत्तेसाठी लढतो, यात चुकीचं काही नाही. मूळ प्रश्न असा आहे की सत्ता कशाला हवी आहे? सत्ता मिळाल्यावर करायचं काय? जे लोक आपल्याला लोकशाही मार्गाने विरोध करतात, त्यांना कायद्याच्या माध्यमातून किंवा गुंडांच्या माध्यमातून धमकावणे, एखाद्या पत्रकाराला अतिरेक्याप्रमाणे वागणूक देणे, स्त्रियांचा अपमान करणे इत्यादीसाठी सत्ता हवी आहे का? औरंगजेबाची सत्ता आणि शिवाजी महाराजांची सत्ता यात बरेच अंतर आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष केला होता. हिंदू महासभा या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष होते. त्यांनाही सत्ता हवी होती. पण सावरकरांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करायचं होतं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात औरंगजेबाला थारा नाही. दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या नेत्याला शिवरायांच्या राज्यात मान सन्मान मिळत असेल, १०० कोटींची खंडणी वसूल केली जात असेल आणि कोरोना काळात जनतेसाठी झटण्याऐवजी महाराष्ट्राचा प्रमुख घरात बसत असेल, तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि सत्ता मात्र औरंगजेबाची चालवता असा याचा अर्थ होतो.

हिंदुत्व सर्वोच्च आहे हे जेव्हा आपल्या राजकारण्यांना कळेल तो सुदिन

सत्ता ही जनतेच्या भल्यासाठी, कल्याणासाठी मिळवायची असते. आपण जनतेची प्रत्येक मागणी पूर्ण करु शकत नाही हे खरं आहे. सगळ्याच सुविधा सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत हेही खरं आहे. पण जनतेच्या इच्छेला केराची टोपली दाखवणं आणि सुविधांच्या नावाखाली जनतेचे हालहाल करणं हे कधीही मान्य होणार नाही. शिवाजी महाराजांचं किंवा सावरकरांचं नाव घेतल्याने स्वराज्य निर्माण होणार नाही. तर राजकारण्यांना तशी कृती करावी लागेल. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही जर हिंदुत्व हा शब्द उच्चारणार असाल तर एकदा सावरकर चरित्र अभ्यासून पाहिलं पाहिजे. जन्मापासून शेवटपर्यंत त्या माणसाच्या मनात केवळ मातृभूमी होती. आपल्याला आताच्या घडीला सावरकरांइतका त्याग करण्याची आवश्यकता राहिली नाही. पण सावरकरांच्या मनाची अवस्था आपल्याला समजून घ्यावी लागेल. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा सोहं असा आवाज येतो, असं अध्यात्मिक गुरु म्हणतात. सावरकर श्वास घ्यायचे तेव्हा मातृभूमी असा आवाज यायचा, इतके ते मातृभूमीशी एकरुप झाले होते.

सत्ता ही मातृभूमीसाठी मिळवायची असते. सत्ता रयतेच्या कल्याणासाठी मिळवायची असते. भारताचं भावविश्व हिंदू राहिलं पाहिजे यासाठी सत्ता मिळवायची असते. सत्ता केवळ एक माध्यम आहे. सत्ता सर्वोच्च नाही. हिंदुत्व सर्वोच्च आहे, हे जेव्हा आपल्या राजकारण्यांना कळेल तो सुदिन…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.