वीर सावरकरांचे हिंदुत्व हीच विरोधकांची दुखरी नस

190

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नुकतेच एक ट्विट करून तुरुंगवासाला घाबरायला आम्ही सावरकर नाही तर आम्ही भगतसिंग यांचे वारस आहोत अशा स्वरूपाचे विधान केले. जगभरातील सहिष्णू हिंदू मनाला दुखावण्यासाठी पुरोगामी गेली काही वर्षे सातत्याने हिंदुह्रदयसम्राट सावरकरांचा अपमान होईल अशी विधाने करत असतात. याचा त्यांना नेमका फायदा किती होतो हे समजणे अवघड आहे. कारण जर ते भाजपाला लक्ष्य करण्यासाठी सावरकरांचा अपमान करत असतील, तर प्रत्यक्षात दिवसेंदिवस भाजपाची मते वाढत असल्याचे दिसून येते. सावरकर आज हयात नसल्याने त्यांचा काही मतदार वर्ग असण्याची शक्यता नाही. पण त्यांच्याविषयी सुप्तपणे मनात आदर बाळगणारा एक प्रचंड जनसमूह भारतात आहे. तो या अपमानाची नोंद घेत असतो.

आज स्वातंत्र्यवीर सावरकर जाऊन ५६ वर्षे झाली तरीही हिंदुत्व विचारसरणीचा पाया हे सावरकर असल्याने त्यांच्यावर चिखलफेक केली की आपला राजकीय फायदा होईल, असे काहीसे या सर्व गैर भाजपा पक्षांना किंवा विचारधारांना वाटत असावे. खरेतर सावरकरांनी ब्रिटीशांची क्षमा मागितली हा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि खिजगणतीत सुद्धा न घेण्यासारखा आहे. कारण इतिहासाच्या प्रवाहात तत्कालीन कायद्यांप्रमाणे सुटका करून घेण्यासाठी जे जे मार्ग उपलब्ध होते, ते ते सावरकरांनी स्वीकारले त्यांची शिक्षा सुद्धा अभूतपूर्व अशी होती. ती फाशी नव्हती, पन्नास वर्षे खितपत जगत राहण्याची शिक्षा होती. अशा प्रकारच्या जन्मठेपेच्या शिक्षा भोगताना असह्य शारीरिक आणि मानसिक कष्टांमुळे अनेक क्रांतिकारक आत्महत्या तरी करत किंवा त्यांना वेड लागायच्या घटना घडत असत.

सावरकरांना तर दोन जन्मठेपेची शिक्षा होती. पुरोगामी मंडळींना बहुधा सावरकरांनी आत्महत्या केली असती किंवा त्यांना वेड लागले असते तरच समाधान मिळाले असते. सावरकरांनी अर्ज विनंत्या करून सुटका करून घेतली यात खरे तर काहीच वावगे नाही हे टीकाकारांनाही माहीत आहे. परंतु सावरकरांनी सुटल्यानंतर पुढे हिंदुत्वाचे राजकारण केले ही त्यांची खरी खंत आहे. वस्तुतः सावरकरांनी अर्ज, विनंत्या केल्या असल्या तरी सुरुवातीपासूनच सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील कार्य, किंवा त्यांचे आवडते सैनिकीकरण धोरणाचे कार्य करण्यासाठीच ही सुटका करून घेत आहोत असाच पवित्रा त्यांनी घेतला होता. त्याला इंग्रजांनी प्रतिसाद दिला नाही कारण ब्रिटिशांना सावरकर सुटका करून घेण्यासाठी खोटी आश्वासने देत आहेत हे माहिती होते. प्रकरण ताजे असल्यामुळे सावरकर किंवा त्यांच्या अनुयायी क्रांतिकारकांना सैन्यात प्रवेश द्यायला ब्रिटिश काही मूर्ख नव्हते. सावरकरांना कसलाही पश्चात्ताप वगैरे होत नसून केवळ सुटका करून घेण्याचा डाव आहे याची ब्रिटिशांना संपूर्ण जाणीव होती आणि तसा शेरा अंदमानला भेट दिलेल्या क्रेडॉक या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सावरकरांच्या अर्जावर लिहून पाठवला होता.

सावरकरांनी, एकवेळ मला सोडले नाहीत तरी चालेल पण माझ्या सहकाऱ्यांना सोडा असाही घोषा लावला होता. यातून त्यांच्या देशभक्तीचाच दृष्टीकोन लक्षात येतो. संपूर्ण आयुष्यात तुरुंगात जाऊन बसणे, जेलभरो आंदोलन करणे हा सावरकरांच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गांचा भागच नव्हता. शत्रूच्या तुरुंगात बसून राहिल्याने स्वातंत्र्य मिळते यावर ज्या स्वातंत्र्ययोध्याचा विश्वासच नाही त्याने तोच मार्ग पत्करावा असा इतरांचा अट्टाहास कशासाठी? शेवटी १९१९ साली सावरकरांनी सुटकेसाठी लिहिलेल्या सहा अर्जांवर कोणतीही कार्यवाही करायची नाही असे सावरकरांना तोंडी सांगावे, असा आदेश तुरुंगाधिकाऱ्यांना देऊन ब्रिटिशांनी अर्जांचा विषय संपवला. सावरकरांनी सुटका करुन घेण्यासाठी एक पवित्रा, चाल म्हणून जी काही पत्रे लिहिली त्याचा आणि त्यांच्या नंतर झालेल्या सुटकेचा कसलाही संबंध उरला नाही. कारण या शेवटच्या अर्जानंतर तब्बल पाच वर्षे म्हणजे १९२४ सालापर्यंत सावरकरांना तुरुंगवासच सहन करावा लागला. त्यामुळे ब्रिटिशांनी सावरकरांची एक निव्वळ सुटका करून घेण्याची चाल आहे हे ओळखून त्या अर्जांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

सावरकर आणि भगतसिंग यांच्यात तुलना करून सावरकरांना कनिष्ठत्व देणे हा पुरोगामी मंडळींचा आवडता खेळ! परंतु स्वतः भगतसिंग यांनीच सावरकरांचा ‘वीर’ असा गौरवपूर्ण उल्लेख केलेला होता, तोही अशावेळी ज्यावेळी सावरकरांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली हे भगतसिंग यांनाही माहिती होते आणि ती एक निव्वळ चाल आहे हेही माहिती होते. भगतसिंग यांच्यावर सावरकरांच्या अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा प्रभाव होता आणि त्या पुस्तकाच्या प्रती छापून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये वितरित केल्या होत्या. इतकेच नव्हे तर सावरकरांनीच अंदमानातून सुटल्यानंतर लिहिलेल्या हिंदुपदपादशाही या पुस्तकातील पाच उतारे भगतसिंग यांनी आपल्या ‘जेल डायरी’मध्ये टिपून घेतले होते. भगतसिंग यांच्या नावाचा वापर पुरोगामी मंडळी केवळ सावरकरांविरुद्ध करायचा म्हणून करतात. अन्यथा भगतसिंग यांनाही गेल्या ७५ वर्षांत भारतरत्न दिले गेलेले नाही. हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल असे प्रचार करणाऱ्या पुरोगामी/काँग्रेसी शासन व्यवस्थेत कोणत्याच सशस्त्र क्रांतिकारकाला योग्य तो सन्मान दिला गेला नाही. वर ही जमात आता सावरकर विरुद्ध भगतसिंग असे खोटेच भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. पुरोगामी मंडळी उठसूट ज्या विचारवंताचा संदर्भ देत असतात आणि जे स्वभावाने गांधीवादी आहेत ते ज्येष्ठ संशोधक कै. श्री य. दि. फडके सावरकरांच्या या तथाकथित क्षमा पत्रांविषयी काय म्हणतात तेही येथे सोबत दिले आहे.

य. दि. फडके म्हणतात…

‘आधी नाशिकमध्ये व नंतर लंडनमध्ये केलेल्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाबद्दल कारावासात तात्यांनी फेरविचार केला आणि त्यामुळे सरकारकडे त्यांनी क्षमायाचनावजा पत्रे पाठविली, असा काहींचा समज झालेला दिसतो. १९५८ साली मुंबई सरकारने भारतीय स्वातंत्र्येतिहासाच्या साधनांचा दुसरा खंड प्रसिद्ध केला. त्यात तात्यांनी ३० मार्च १९२० रोजी अंदमान-निकोबार बेटांच्या मुख्य आयुक्तांना पाठवलेला अर्ज प्रसिद्ध केलेला आहे. या अर्जात, निष्ठापूर्वक सरकारशी सहकार्य करण्याची भाषा त्यांनी वापरली आहे हे खरे; पण ती भाषा शब्दशः खरी धरता कामा नये. व तात्यांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागचा त्या वेळचा राजकीय संदर्भ, तसेच इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेली प्रतिक्रिया समग्र लक्षात घेतली, तर तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते हे लक्षात येते. पन्नास वर्षे अंदमानच्या अंधेरीत कुजत राहून जीवितयात्रा संपवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त किंवा बिनशर्त मुक्त होण्यासाठी ते अंदमानातून प्रयत्न करीत होते. म्हणूनच सुटकेला उपकारक अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे असे वाटले की सुटकेसाठी ते अर्ज करीत असत. या व्यावहारिक धोरणाला यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्वासने देत असत आणि सहकार्याचे आमिष दाखवीत असत. १९३७ पर्यंत ते हा खेळ खेळत होते.’ (शोध सावरकरांचा पृ. ५०-५१)

सावरकरांच्या तथाकथित क्षमापत्रांवर ज्येष्ठ गांधीवादी पुरोगामी विचारवंत य. दि. फडके यांनी दिलेल्या या निष्कर्षाशिवाय अन्य कोणताही निष्कर्ष विचारात घेण्याची गरजच नाही, इतका तो वस्तुस्थितीला धरून आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.