मैत्री दिनाच्या सेलिब्रेशनला अजून आठवडा शिल्लक असताना राणीबागेत अस्वलांच्या जोडीची झालेली मैत्री सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्ती वाघाच्या शेजारील शिवानी या मादी अस्वलाला आता मित्राच्या रूपाने पिंजऱ्यात नवा जोडीदार मिळाला आहे. पर्यटक हे शक्ती वाघाच्या पिंजऱ्यासह आता शिवानी आणि शिवा यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध पाहणेही पसंत करत आहेत.
शिवानी स्वमग्न राहणेच पसंत करायची
लॉकडाऊनच्याअगोदरच शिवानी हे मादी अस्वल गुजरातच्या सुरत प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले होते. मात्र माणसाकडूनच लहानाची मोठी झालेल्या शिवानीला आपल्याच जगात रमणे पसंत होते. कोरोना काळानंतर राणीबाग पर्यटकांसाठी खुली झाली, मात्र शिवानी माणसांना पाहून एका कोप-यात जाऊन बसू लागली. अखेर राणीबाग प्रशासनाने शक्कल लढवून शिवानीला पर्यटकांसमोर आणले. मात्र शिवानी स्वमग्न राहणेच पसंत करत होती. पाच वर्षांची शिवानी पिंजऱ्यातला कोपराच पसंत करायची.
अखेर शिवा आला
नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयातून मार्च महिन्यात अडीच वर्षाच्या शिवाचे राणीबागेत आगमन झाले. त्याला ७ जुलैला शिवानीच्या पिंजऱ्यात हलवले गेले. एरव्ही आपल्याच विश्वात रमणारी शिवानी शिवसोबत सहज मिसळली. शिवानी आनंदाने शिवासह पिंजऱ्यात बागडू लागली. मचाणावर एकत्र बसून एकमेकांना दोघेही वेळ देऊ लागले. शिवाची संगत मिळाल्याने आता शिवानीही खऱ्या अर्थाने राणीबागेत रुळल्याचे पाहून अधिकारीही सुखावले. शिवाला पाण्यात खेळणे पसंत आहे, शिवा पाण्यात अंघोळ करतो. शिवानी पाण्यात येत नाही पण त्याला न्याहाळते.
मिलनासाठी वय आडवे
शिवा वयाने शिवानीपेक्षाही लहान आहे. शिवा केवळ अडीच वर्षांचा आहे, त्यामुळे शिवाचे मिलनाचे योग्य वय नाही. त्यांच्यात फुललेली मैत्री पाहूनच सर्व जण आनंदी आहेत.