आगामी काळात देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील. अनेक राज्यात तीच स्थिती आहे. महाराष्ट्रातही शिवसेना संपुष्टात येतेय, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बिहारमधील पाटण्यात केले. तेथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात देशातील प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या मोठ्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नड्डांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून भाजपावर टीका होताना दिसतेय. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले आहे. अशातच नड्डांच्या वक्तव्यावर भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय दिले फडणवीसांनी स्पष्टीकरण
महाराष्ट्रात शिवसेना संपुष्टात येतेय, असे नड्डा म्हणाले नव्हते. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी शिवसेना होती ती राहिलेली नाही, असे नड्डा यांना म्हणायचे होते. आता जी नवी शिवसेना तयार झाली आहे, ती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात तयार झालेली आहे. नड्डा ज्या शिवसेनेबद्दल बोलले, ती उद्धव ठाकरेंची, एकनाथ शिंदेंची नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस माध्यमांशी बोलताना दिले. कृपया लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
(हेही वाचा – देशाचे पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच! भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य)
काय म्हणाले जेपी नड्डा
भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. यासह राज्यात शिवसेनेचा अंत होत असून देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही, जो भाजपला पराभूत करू शकेल. बिहार येथील १६ जिल्ह्यातील भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पाटणा येथे बोलत होते.
Join Our WhatsApp Community