मुंबईतून गुजराती आणि मारवाड्यांना वगळलं तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यात विविध कारणांवरुन वादविवाद झाल्याचे पहायला मिळाले.
त्यामुळे कोश्यारी हे राज्याच्या राजकारणातील आजवरचे सर्वात वादग्रस्त राज्यपाल असल्याचे म्हटले जात आहे. राज्याच्या राजकारणापासून अलिप्त असावेत म्हणून दुस-या राज्यातील व्यक्तीला राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात येते. पण तरीही भगतसिंह कोश्यारी हे अनेक वेळा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेले भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडमध्येही भाजपचे वादग्रस्त नेते म्हणून प्रसिद्ध होते. 9 वर्षांपूर्वी एका भाषणात त्यांनी केलेले एक वादग्रस्त विधान आता समोर येत आहे.
(हेही वाचाः 5G Spectrum लिलाव पूर्ण, या कंपन्या देशात पसरवणार 5G चे जाळे)
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका
2012 मध्ये उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेस नेते विजय बहुगुणा विराजमान होते. विजय बहुगुणा हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचे सुपुत्र. विजय बहुगुणा हे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेले भगतसिंह कोश्यारी हे त्यावेळी उत्तराखंडमध्ये भाजपकडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत होते. त्यावेळी देहराडून येथील एका कार्यक्रमात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.
कोश्यारींचे वादग्रस्त विधान
‘विजय बहुगुणा मी तुम्हाला सांगतो ज्यांचा लोक सन्मान करतात त्या हेमवती नंदन बहुगुणा यांचे तुम्ही सुपुत्र आहात की नाही हे डीएनए चाचणी करुनच सिद्ध होईल. तुम्ही केवळ गडवाली बोलून दाखवा’, असे विधान त्यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरुन त्यावेळीही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community