‘माझ्याकडून चूक झाली, विनम्र राज्यसेवकाला क्षमा करा’, राज्यापालांनी मागितली माफी

160

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. अनेक राजकीय पक्षांकडून त्यांच्याविरोधात आंदोलन देखील छेडण्यात आले आहे. भाजपने देखील आपण राज्यपालांच्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे. पण याच आपल्या विधानाबाबत आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रक तयार करत राज्यपालांनी राज्यातील जनतेची माफी मागितली आहे.

राज्यपाल कोश्यारींचे निवेदन

29 जुलै रोजी अंधेरीत झालेल्या एका कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली आहे. महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय योगदान आहे. यामुळेच आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

(हेही वाचाः ‘गद्दारांच्या गाड्या फोडा, उद्धव ठाकरे सन्मान करतील’, शिवसेना नेत्याचे वादग्रस्त विधान)

गेल्या तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यादिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

(हेही वाचाः जेव्हा कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती डीएनए टेस्टची मागणी)

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरुन राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो, असे निवेदन देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेची दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.