गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून दर दिवसाला कोरोना रुग्णांच्या मृत्यूची घटती संख्या सोमवारी, 1 आॅगस्ट रोजी अजूनच घटली. गेल्या दीड महिन्यात पहिल्यांदाच राज्यात केवळ एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. सोमवारी बीडमध्ये एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली गेली.
रुग्ण संख्याही घटली
बीए व्हेरिएंटमुळे राज्यात रुग्ण संख्या वाढत असताना मुंबईत दर दिवसाला एक किंवा दोन रुग्णांचा मृत्यू होत होता. सोमवारी मात्र मुंबईत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सोमवारी डिस्चार्ज रुग्णांची संख्या नव्या रुग्णांच्या नोंदीच्या तुलनेत तीनशेहून अधिक जास्त होती. नव्या रुग्णांमध्ये सोमवारी केवळ ८३० रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत १ हजार २४ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन दिवसांपासून ९८ टक्क्यांवरच कायम आहे. सोमवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आता रुग्णसंख्या १२ हजार ८०८ वर खाली उतरली आहे.