विकासासाठी आता डबल इंजिन, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार – एकनाथ शिंदे

132

देशात महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’चे (एमआयडीसी) मोठे योगदान असून, यापुढे प्रगती पथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत. त्यामाध्यमातून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हिरक महोत्सवा निमित्ताने वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, एमआयडीसीचे कार्य उल्लेखनीय आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक भूसंपादन महामंडळाने केले आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. तरुणांसाठी रोजगार निर्मिती या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. कोरोना काळात उद्योग बंद होऊ न देता काम सुरू राहीले. राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक यामुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसायात वाढ होणार आहे. पंतप्रधानांनी राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात पुढे जाता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा “प्लास्टिकला पर्याय सुचवा, कोणीही बेरोजगार राहणार नाही”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

एमआयडीसी हा राज्याचा वैश्विक चेहरा – फडणवीस

औद्योगिक विकास महामंडळ ही संस्था महाराष्ट्राचा वैश्विक चेहरा आहे. राज्याला एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यात एमआयडीसीचे मोठे योगदान आहे. राज्यात असलेली पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणूक  यामाध्यमातून हे साध्य करता येणार आहे. कोणत्याही राज्याच्या दहा वर्षे पुढे जाण्याची क्षमता आपल्या राज्याची आहे. स्टार्टअप क्षेत्रात राज्यात सर्वाधिक उद्योग आहेत, युनिकॉर्न कंपन्या राज्यात आहेत. सेवा, उद्योगांसह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे राज्य सर्व उद्योग क्षेत्रांत आपला प्रथम क्रमांक राखणार आहे. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे, इतर राज्यांनी आपली क्षमता वाढविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.