भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषेच्या बाबतीत स्वतंत्र ओळख असली, तरी सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकरुप झाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषिकांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
( हेही वाचा : मराठी भाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा बहाल करा; खासदार राहुल शेवाळेंची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी )
‘गुजराती सांस्कृतिक फोरम’ या मुंबईतील सामाजिक-सांस्कृतिक संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रात आल्यावर मी स्वतः ५-६ महिन्यांत चांगली मराठी शिकलो. राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमधील दीक्षांत समारंभाचे संचलन, तसेच चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या व्यापार विषयक संस्थांमध्ये सूत्रसंचलन मराठी भाषेतून किंवा शक्य नसल्यास हिंदीतून करावे, असे मी आग्रहाने सांगत असतो, असे राज्यपालांनी सांगितले.
मुंबई, महाराष्ट्राचा अभिमान – दिलीप जोशी
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतून जेठालालचे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी ऐतिहासिक अशा राजभवनात राज्यपालांच्या हस्ते सन्मान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. माझा जन्म मुंबईत झाला. महाराष्ट्रात जन्मलो याचा मला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्यासह पत्रकार कुंदन व्यास, नेत्र चिकित्सक डॉ. कुलीन कोठारी, नाट्यलेखक प्रवीण सोळंकी, कवी-लेखक अंकित त्रिवेदी, उद्योजक विनेश मेहता, कमला मेहता, अंधशाळेच्या अध्यक्षा हंसाबेन मेहता, नेहरू तारांगणचे माजी संचालक डॉ. जे जे रावल, प्रशासकीय अधिकारी खुश्वी गांधी, उद्योगपती अशोक मेहता व समाजसेवक विपुल मेहता यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community