एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पायऊतार व्हावे लागले असले, तरी अजित पवार शिंदे-फडणवीसांशी दोस्ताना राखून आहेत. त्यामुळेच उपमुख्यमंत्रीपद गेल्यानंतरही ‘देवगिरी’ बंगला आपल्याकडे कायम राखण्यात त्यांना यश मिळाले आहे.
( हेही वाचा : नायगाव ‘बीडीडी’मधील २०६ गाळेधारकांची पुनर्वसित इमारतींमध्ये सदनिका निश्चिती )
‘देवगिरी’ हा बंगला यापूर्वी उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेत्यांना दिला जायचा. पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला त्याचे वाटप करण्यात आले आहे. या निर्णयाचे पुर्वोधारण होणार नाही आणि त्याचा पायंडा पडणार नाही, या अटीनुसार हा बंगला विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना ‘देवगिरी’ बंगला देण्यात आला होता. गेल्या अडीच वर्षांपासून ते या बंगल्यात वास्तव्यास आहेत. मविआ सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मंत्रिमंडळातील सदस्यांसह विरोधी पक्षनेत्यांनाही शासकीय बंगला दिला जातो. आतापर्यंतच्या इतिहासानुसार आकाराने लहान बंगला विरोधी पक्षनेत्याच्या वाट्याला आल्याचे पहायला मिळते. परंतु, अजित पवार त्यास अपवाद ठरले आहेत.
दोस्तीचे फळ?
आपल्याकडील देवगिरी बंगला कायम रहावा, अशी विनंती विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्याला फडणवीसांनी मान दिला. दोहोंमधील दोस्तीचे हे फळ आहे का, अशा चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे अन्य बंगल्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन आणि अग्रदुत येथून, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर या शासकीय निवासस्थानातून कारभार पाहत आहेत.
Join Our WhatsApp Community