राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारतीयांकडून उल्लेखनीय अशी कामगिरी करण्यात येत आहे. मंगळवारीही भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत भारताला सुवर्पदकांची कमाई करुन दिली आहे. 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता टेबल टेनिसमध्येही भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या पुरुष संघाने आपले जेतेपद कायम राखत सिंगापूरवर 3-1 ने विजय मिळवला आहे.
पुरुष टेबल टेनिस सांघिक क्रिडा प्रकारात भारताने आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. पुरुष दुहेरीच्या पहिल्याच लढतीत भारताने विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली होती. हरमीत देसाई व साथियन ज्ञानसेकरन या जोडीने सिंगापूरच्या याँग इझाक व येव एन कोएन पँग यांचा 13-11, 11-7,11-5 असा पराभव केला.
पण पुरुष एकेरीत मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सिंगापूरच्या झे यू क्लेरेन्सने भारताच्या अचंथा कमलचा 11-7,12-14,11-3,11-9 असा पराभव करत सिंगापूरला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. पण पुरुष एकेरीच्या दुस-या सामन्यात साथियनने येव एन कोएन पँगवर 12-10,7-11,11-7,11-4 असा विजय मिळवला. त्यामुळे भारताला 2-1 अशी आघाडी मिळाली.
टेबल टेनिस एकेरीच्या तिस-या सामन्यात हरमीत देसाईने सिंगापूरच्या झे यू क्लेरेन्सचा 11-8,11-5 अशी कडवी झुंज देत तिसरा डाव 11-6 ने जिंकून भारताला 3-1 ने आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारताने टेबल टेनिसच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
आतापर्यंत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या एकूण 12 खेळ प्रकारांत भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. यामध्ये नेमबाजीत सर्वाधिक 63 त्याखालोखाल वेटलिफ्टिंगमध्ये 46,कुस्तीत 43,बॉक्सिंग 8,बॅडमिंटन 7,टेबल टेनिस 6, अँथलेटिक्स 5,तिरंदाजी 3, तर हॉकी,टेनिस,स्क्वॉश व लॉन बॉलमध्ये प्रत्येकी 1 अशी सुवर्णपदके मिळाली आहेत.
Join Our WhatsApp Community