रस्त्याचे काम सुरू आहे का? क्यू आर कोड स्कॅन करा आणि जाणून घ्या किती काम झाले ते!

162
रस्त्यांच्या कामात गुणवत्ता सुधारणेचा प्रयत्न करतानाच आता प्रत्येक रस्त्यांच्या कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत आहे. यासाठी सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष कामे सुरू असताना, त्याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना कळावी, यासाठी बॅरिकेडवर क्यूआर कोड प्रकाशित केला जाणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून जनतेला संबंधित रस्ते कामाचा तपशील सहजपणे कळू शकणार आहे.
मुंबईतील सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी एकूण सुमारे ५ हजार ८०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ५ निविदा निमंत्रित केल्या आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटने बांधले जाणार असून, त्यामुळे येत्या दोन वर्षात संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे. वेगवेगळ्या रस्ते कामांच्या निविदा एकत्रित स्वरूपात मागवल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित व मोठ्या कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

( हेही वाचा: राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी होणार निर्णय! सर्वोच्च न्यायालयात असा झाला युक्तिवाद )

मेकॅनाईज्ड स्लीप फॉर्म पेवर` (Mechanised Slip Form Paver) या अत्याधुनिक संयंत्राचा वापर करून कमीत कमी कालावधीत सर्वोत्कृष्ट दर्जाची रस्ते बांधणी करण्याची अट या निविदांमध्ये समाविष्ट केली आहे. या सर्व रस्त्यांची कामे कार्यादेश दिल्यानंतर पावसाळा वगळता २४ महिन्यांमध्ये पूर्ण करायची आहेत. कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा दोष दायित्व कालावधी १० वर्षे राहणार आहे. रस्ते कामांचे देयक अदा करताना त्यातील २० टक्के रक्कम ही राखून ठेवली जाणार आहे. जेणेकरून दोष दायित्व कालावधीमध्ये रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती योग्य रीतीने करून घेण्यात येईल,असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय रस्ते बांधणी करताना त्यामध्ये अपेक्षित गुणवत्ता राखली जावी म्हणून देखरेख करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रक संस्थाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.