उदय सामंत हल्ला प्रकरण: आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी

171

शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे मुख्यमंत्र्यासह मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी शिवसैनिकांनी कात्रज भागात त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींमध्ये शिवसेना शहरप्रमुखाचा समावेश आहे.

(हेही वाचा – हल्ल्यानंतर सामंतांचा ठाकरेंवर निशाणा! म्हणाले, “सोज्वळ चेहऱ्यापलीकडचे प्रकार…”)

उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मंगळवारी कात्रज चौकामध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोली संपर्क प्रमुख बबन थोरात यांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ला प्रकरणात अटक केल्यावर आरोपीवर ३५३, १२०, ३०७, ३३२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच्याशिवाय ३ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, आज पोलिसांनी काही जणांना अटक करून त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते.

एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे हिंगोली संपर्क प्रमुख बबन थोरात यांना चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. तसंच मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर,चंदन साळुंके,सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण १५ जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

उदय सामंत हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. उदय सामंत हे मोहमद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. इथल्या चौकाजवळ आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे उदय सामंत यांचा ताफा होता. कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना गाडीत बघितलं त्यानंतर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पण, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.